लाभार्थीच्या शोषणासाठी नव्हे, तर न्यायासाठी व समाजाच्या फायद्यासाठी बौद्धिक संपदेचा व त्याच्याशी निगडित कायद्यांचा वापर झाला पाहिजे. दुष्काळी स्थितीत शेतीतले दारिद्र्य वाढले असताना या कायद्यांचा शेतकऱ्यांच्या हितासाठी व प्रगतीसाठी प्रभावी वापर होण्यास जाणीवजागृती वाढणेही गरजेचे ठरले आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध वकील विष्णू ढोबळे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या पदव्युत्तर विभागाच्या वतीने अ‍ॅड. ढोबळे यांचे ‘बौद्धिक संपदा कायदा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. भारत हंडीबाग होते. डॉ. संजय मून, डॉ. विलास इप्पर, प्रा. सोनाली क्षीरसागर उपस्थित होते. मराठवाडय़ाचा विचार करता शेतकऱ्यांचे हित साध्य करताना शेतीक्षेत्राचे संवर्धन होणे क्रमप्राप्त ठरते. वेगवेगळे संशोधित बी-बियाणे, अवजारे वगैरे विकसित झाले असले तरी शेती करणे आज परवडत नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला असून आत्महत्यांचे प्रमाणही मध्यंतरी बरेच वाढले. शेतीतले दारिद्र्य वाढले असताना बौद्धिक संपदाविषयक कायद्याची माहिती व फायदा या वर्गाला होण्यासाठी सर्वच संबंधित घटकांनी  प्रयत्न करणे गरजेचे आहे.