पायाभूत विकास म्हणजे प्रगती एवढय़ापुरते मर्यादित न राहता देशासंबंधीची खरी जाणीव असणारा समाज निर्माण करा. तसेच पैसा आणि प्रतिष्ठा यापुढे जाऊन आपल्या भूमीसाठी, समाजासाठी अधिकारवाणीने कार्य करा, असे आवाहन पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी वारणानगर (ता.पन्हाळा) येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील यशवंतांचा वारणानगर येथील सुराज्य फौंडेशनच्या वतीने खास आयोजित कार्यक्रमात वारणा सहकारी समूहाचे अध्यक्ष व सुराज्य फौंडेशनचे संस्थापक, आमदार विनय कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात कोरे बोलत होते.
अधिकाऱ्यांनी ठरविले तर काय करू शकतो हे चालत आलेल्या सिस्टिमचा एक घटक म्हणून कार्य न करता संघर्ष टाळून मानसिकता बदलून समाजहिताच्या जाणिवेतून कार्य करा. ते करतांना पर्यावरण आणि विकास यांची सांगड घालण्याची गरज प्रतिपादित केली.
महाराष्ट्रातील ८५ उत्तीर्णापैकी २९ यशवंत या सत्कार सोहळ्यास उपस्थित होते. विद्यार्थी-पालक यांच्या मोठय़ा उपस्थितीतील या सोहळ्यात सुराज्य स्पर्धा परीक्षेतील नैपुण्यांचा या यशवंतांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यातील श्वेता शामराव पाटील (चावराई विद्यालय) व शिवदत्त प्रकाश पाटील (वारणा महाविद्यालय) या विद्यार्थ्यांचीही सद्यस्थितीवर प्रभावी भाषणे झाली.
सलग सातव्या वर्षी पार पडलेल्या या ‘व्हिजन २०१३’ सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर प्रा.दिनेश पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन.एच.पाटील यांनी फौंडेशनच्या उपक्रमांचा आढावा घेत दुजाभाव सोडल्यास सुख व यश मिळते असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित यशवंतांपैकी विजय अमृता कुलगे (जामखेड-पुणे), राजेंद्र राऊत (बुलढाणा), मृण्मयी जोशी (पुणे), सचिन कुंभार (वारणा रेठरे, ता.शाहूवाडी), विनीत लोटे (सांगली), मोनिका पांडे(नाशिक), हरेश्वर स्वामी (उदगीर-लातूर), परवेज नाईकवडी (सातारा), प्रतीक टबे (पुणे) यांनी आपली मनोगते व्यक्त करून यूपीएससी परीक्षेबाबत न्यूनगंड दूर करून स्वतला ओळखा व परीक्षेला सामोरे जा असे आवाहन केले आणि समाजहितासाठी कार्य करू असे नमूद करून कार्यक्रमाच्या वेगळेपणाचे कौतुक केले. प्रा.जीवनकुमार शिंदे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमास वारणा कारखान्याच्या अध्यक्षा शोभाताई कोरे, वारणा दूध संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गुळवणी, डॉ.आशूताई कोलूर, व्ही.एस.चव्हाण, विजय वाणी, वारणा समूहातील संस्थांचे पदाधिकारी-कार्यकर्ते, विद्यार्थी-पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 24, 2013 1:05 am