उत्तराखंडच्या ढगफुटी, भुस्खलन, पूर या तिहेरी आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थतीने संपूर्ण देश हतबल झाला असताना भारतीय जवान तसेच स्वयंसेवकांनी प्राणांची बाजी लावून बचावकार्य चालवले. या घटनेमध्ये प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने पुढाकार घेतला. त्यामुळे गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचली आहे. अशा आपत्तीस तोंड देताना प्रसारमाध्यमांची भूमिका व त्यांनी आखावयाचे आराखडे या सदर्भात डॉ. देसाई यांनी मोलाचे संशोधन केले आहे. आपत्ती व्यवस्थापनाबाबत अन्य भाषांमध्ये अनेक पुस्तके उपलब्ध आहेत, मात्र मराठीत या विषयावर पुरेशी माहिती उपलब्ध नाही. डॉ. गणेश देसाई यांच्या पुस्तकाचा लाभ आपत्ती व्यवस्थापनासाठी होईल, असे मत विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी व्यक्त केले.
‘आपत्ती व्यवस्थापन माध्यम संशोधन दृष्टिकोन’ या डॉ. गणेश देसाई लिखित पुस्तक प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी औरंगाबादचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार व अपर आयुक्त गोकुळ मवारे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी विभागातील सर्व निवासी उपजिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मराठी भाषेत आपत्ती व्यवस्थापनावरील पुस्तकाची गरज होती असे सांगून जयस्वाल पुढे म्हणाले की, डॉ. देसाई यांनी पुस्तकात मांडलेले संशोधन आगामी काळात आपत्ती व्यवस्थापन करण्यासंदर्भात मोलाचे ठरणार आहे. या पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर करावे अशी सूचना त्यांनी केली. या पुस्तकानंतर आपत्ती व्यवस्थापनात दुष्काळ व्यवस्थापन करण्यासंदर्भात विशेष पुस्तक लिहावे असे आवाहन त्यांनी केले.
आपत्ती नुसता शब्द जरी ऐकला तरी अंगावर शहारे उभे राहतात आणि जर खरोखर आपत्ती येण्याची सूचना मिळाली तर सगळीकडे घबराट, गोंधळ व भीतीचे वातावरण निर्माण होऊन तारांबळ उडते, प्रत्यक्ष येणाऱ्या आपत्तीने जेवढे नुकसान होते, त्यापेक्षाही कितीतरी पटींनी नुकसान हे भयामुळे होते, त्यामुळे आपत्तीपूर्व, आपत्तीदरम्यान व आपत्तीनंतर माहिती केवळ घबराट निर्माण करणारी असू नये तर ती अचूक, नेमकी व संक्षिप्त स्वरूपात असावी. त्यामुळे आपत्तीबाबत अफवा न पसरता लोक आपत्तीशी खंबीरपणे सामना करू शकतील, असे प्रतिपादन डॉ. देसाई यांनी केले.