News Flash

नाशिक क्रीडा महासंघाची गरज

खेळाडूंसाठी मैदान..क्रीडा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा..खेळाडूंना वैद्यकीय मदत, या समस्या मांडण्यासह मे महिन्यात क्रीडा महोत्सवाचे आयोजन करावे, सर्व खेळांच्या शालेय स्पर्धा त्या खेळाच्या

| January 13, 2015 08:40 am

विविध क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींचा सूर

खेळाडूंसाठी मैदान..क्रीडा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा..खेळाडूंना वैद्यकीय मदत, या समस्या मांडण्यासह मे महिन्यात क्रीडा महोत्सवाचे आयोजन करावे, सर्व खेळांच्या शालेय स्पर्धा त्या खेळाच्या संघटनांमार्फत घ्याव्यात आणि क्रीडा महासंघ असावा, अशा सूचना येथे विविध क्रीडा संघटना व क्रीडा संस्था यांच्या एकत्रित आयोजित बैठकीत करण्यात आल्या.
क्रीडा संघटनांच्या विविध स्तरावरील अडचणी समजून घेण्यासाठी नाशिक जिमखाना येथे ही बैठक झाली. यावेळी विविध क्रीडा संघटना व संस्थांच्या प्रतिनिधींनी मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना नरेंद्र छाजेड यांनी क्रीडा संघटनांच्या समस्यांचा अग्रक्रम ठरवून त्या समस्यांची, शासन, महापालिका असे वर्गीकरण करून त्या सोडविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी गोरखनाथ बलकवडे यांनी आपण सर्वानी एकत्र राहिल्यास नाशिकच्या क्रीडा क्षेत्रास निश्तिच चालना मिळेल. खेळाडूंच्या नोकरीमधील आरक्षण विषयाचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. कारण अनेक खेळाडू नोकरीपासून वंचित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. साहेबराव पाटील यांनी मुलांना खेळण्यासाठी प्रवृत्त करण्याकरिता आपल्याला प्रयत्न करावे लागतील, असे मत व्यक्त करून महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या माध्यमातून अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
आनंद खरे यांनी सर्वानी एकत्र राहण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ क्रीडा संघटक आबा देशमुख यांनी प्रत्येकाने अहंभाव बाजूला ठेवल्यास खेळाची प्रगती होऊ शकेल, असा आशावाद व्यक्त केला. बैठकीत मंदार देशमुख, रवी मेतकर, अनिल वाघ, डी. एस. बुलंगे, प्रशांत भाबड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन क्रीडा संघटक अविनाश खैरनार यांनी केले.
नाशिकचे सात नेटबॉलपटू
राष्ट्रीय संघात
नाशिक नेटबॉल संघटनेच्या शिवानी पाटील, सर्वेश पाटील, शंतनु आहेर, पार्थ दाभाडे, सौरभ ढेमसे, कृतिका वालझाडे, अनुष्का पगारे या सात खेळाडूंची ६० व्या शालेय राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. वर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने वतीने १९ वर्षांआतील शालेय राज्यस्तर स्पर्धेमध्ये नाशिक विभागाचे नेतृत्व केटीएचएम महाविद्यालयाने केले. या संघातून सतत चार वर्षे शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणारी शिवानी पाटीलची सलग पाचव्यांदा दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जालना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित १७ वर्षांआतील शालेय राज्यस्तर स्पर्धेत नाशिक विभागाचे नेतृत्व करणाऱ्या सेंट फ्रान्सिस हायस्कूल (तिडके कॉलनी) संघातील सौरभ ढेमसे या खेळाडूची छत्तीसगढ येथे होणाऱ्या ६० व्या शालेय राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर, गाजियाबाद येथे आयोजित १४ वर्षांआतील शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी सर्वेश पाटील यांची सलग तिसऱ्यांदा तर शंतनु आहेर यांची दुसऱ्यांदा आणि पार्थ दाभाडे यांची निवड झाली आहे. मुलींमध्ये कृतिका वालझाडे, अनुष्का पगारे यांची निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुरेखा देवरे, स्वप्नील कर्पे यांचे मार्गदर्शन लाभले.
नाशिक जिमखान्यात
 बिलियर्डस्, स्नूकर स्पर्धा
नाशिक जिमखान्याच्या वार्षिक क्रीडा स्पर्धातंर्गत खुल्या बिलियर्डस् आणि स्नुकर स्पर्धा १७ जानेवारी ते तीन फेब्रुवारी या कालावधीत जिमखान्यात होणार आहेत. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका नाशिक जिमखान्यात १५ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत द्याव्यात, अशी माहिती संस्थेचे मानद सचिव राधेशाम मुंदडा व स्पर्धा सचिव शेखर भांडारी यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 8:40 am

Web Title: need of nashik sports federation
टॅग : Loksatta
Next Stories
1 सामाजिक संवेदना जागृत ठेवणे आवश्यक
2 पर्यावरण जागृतीसाठी नाशिक-शेगाव सायकल यात्रा
3 ओझर विमानतळावरून प्रवासी वाहतुकीच्या दिशेने वाटचाल
Just Now!
X