ज्ञानवंत, संत, अभ्यासकांचे राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सर्वात मोठी वाचनसंस्कृती रुजली. परंतु आता वाचनसंस्कृती पूर्णपणे ढासळली. तरुणांना बौद्धिक, भावनिक व सांस्कृतिकदृष्टय़ा श्रीमंत करणारा अनुभव मिळाल्यास ते वाचनसंस्कृतीकडे झपाटय़ाने आकर्षित होऊ शकतील, असे मत ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांनी व्यक्त केले.
येथील ए. एच. वाडिया वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत टिकेकर बोलत होते. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अमोलकचंद सुराणा, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अॅड. सदानंद वैद्य, विश्वस्त सरचिटणीस नामदेव क्षीरसागर, अॅड. कालिदासराव थिगळे आदी उपस्थित होते. टिकेकर म्हणाले, की तरुण पिढीला बौद्धिक, भावनिक व सांस्कृतिक श्रीमंत करणारा अनुभव मिळाल्याशिवाय ते वाचनसंस्कृतीकडे ख-या अर्थाने वळणार नाहीत. आज सृजनशील साहित्याची गरज आहे. सृजनशील वाचन केल्यास विचारांची प्रगल्भता वाढेल. जुन्या पुस्तकांचा संग्रह म्हणजे समृद्ध गाव होय. चरित्रात्मक वाचन केल्यानंतर आत्मचरित्राला मानाचे स्थान मिळेल. विषयाच्या तत्त्वज्ञानाकडे जाऊन वाचन केले पाहिजे. आज तत्त्वचिंतेचा अभ्यास होत नाही. गंभीर विषयावरील पुस्तके वाचली गेली पाहिजेत, लिहिली गेली पाहिजेत आणि प्रत्येकाला मराठी यायलाच पाहिजे हा आग्रह वाचनाबद्दल धरणे महत्त्वाचे आहे. आज गंभीर पुस्तके कोणी वाचत नाही. आजच्या समाजाची धारणा डोक्याला मानसिक ताप नको, सोप्याचा स्वीकार सगळय़ांनी केला पाहिजे, अशी आहे. त्यामुळे मराठी भाषेचा घात झाला आहे. अनिलकुमार होळकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दिलीप गांधी यांनी आभार मानले.