23 September 2020

News Flash

वाहतूक नियमांची माहिती शाळास्तरावर देण्याची गरज

वाहतूक नियमांची माहिती मोठय़ांनाही दिली जात असली तरी ती शाळास्तरावर निरंतर दिली जावी

| February 14, 2014 07:22 am

वाहतूक नियमांची माहिती मोठय़ांनाही दिली जात असली तरी ती शाळास्तरावर निरंतर दिली जावी, असा मतप्रवाह जोर धरू लागला असून तसे केल्यास तो पुढील आयुष्यात खऱ्या अर्थाने सुजाण नागरिक होईल, असे अनेक नागरिकांना वाटते.
हलगर्जीपणाने वाहन दामटून एकापेक्षा जास्त प्राणांतिक अपघात करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचे तसेच अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देणाऱ्या पालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस आयुक्तांनी दिले होते. विद्यार्थ्यांना शाळेतच वाहतूक नियमांचे धडे देण्यासाठी ‘आरएसपी’ योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याची गरज आहे. हे शिक्षण देणाऱ्या शाळांची संख्या वाढवण्याची गरज असून शाळांनीही त्यासाठी स्वत:हून पुढे आले पाहिजे. शिक्षण संस्था पुढे येत नाही, असे म्हणत हातावर हात ठेवत न बसता पोलिसांनीही पुढे येण्याची गरज आहेच. वाहतूक नियमनासाठी आरएसपी विद्यार्थ्यांची मदत घेता येऊ शकते. मात्र, विद्यार्थी असल्याने त्यांच्यावर कामाचा बोझा पडता कामा नये, याचीही काळजी घेतली गेली पाहिजे. किमान त्यांच्या शाळाच्या परिसरात काहीवेळ वाहतूक नियमन केले तरी पुरेसे आहे. पोलिसांनी ‘लक्ष्मीदर्शन’ सोडून कामावर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे. वाहतूक जनजागृतीसाठी अनेक संघटना काम करीत आहेत. नागपूरचे रवींद्र कासखेडीकर यांच्यासह ‘जनआक्रोश’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गेले अनेक आठवडे शहरातील विविध चौकात वाहतूक नियमन जनजागृती केली.
सिग्नल्सची नियमित देखभाल संबंधित यंत्रणेने लक्षपूर्वक करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी सिग्नल्स व झेब्रा क्रॉसिंग तयार होणे गरजेचे आहे. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशाच रितीने नागरिकांनी वाहने ठेवावी. मात्र, पार्किंगची योग्य जागा ठरवून देणे ही संबंधित यंत्रणेचीही जबाबदारी ठरते. अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक नियमनाबाबत लोकशिक्षण व समाज प्रबोधन, तेही संस्कारक्षम वयात शालेय माध्यमातून शिकवण्याची गरज आहे. शहरांमध्ये वाहन असणे ही अपरिहार्य बाब आहे. बदलत्या काळाबरोबर चालायचे तर या वेगाला न घाबरता त्याचा अतिरेक टाळला पाहिजे. प्रत्येक वाहन चालकाने साध्या सोप्या वाहतूक नियमांचे पालन केले तर वाहनांमुळे होणारे अपघात, त्यामुळे सोसाव्या लागणाऱ्या शारीरिक यातना व हानी बऱ्याच अंशी कमी करता येतील. ‘शिस्त पाळा दंड टाळा’, प्रवेश बंद, एकेरी वाहतूक, पार्किंग, हेल्मेट हे सारे काही आपल्या सुरक्षिततेसाठी आहे. शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी या बाबत स्वतंत्र वाहतूक रस्ता सुरक्षा व नियम हा विषय असणे काळाची गरज आहे.

‘प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करावे’
बेशिस्त वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस त्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी रोजच झटत असतो. उपलब्ध मनुष्यबळात व साधनसामुग्रीत पोलिसांची धडपड सुरू असते. ‘स्पीड गन’,  ब्रीथ अॅनालायझर, क्रेन्स वगैरे आवश्यक असून ते उपलब्ध आहेत. अपघात टाळायचे असतील तर वाहतूक नियमांचे प्रत्येकानेच पालन गरजेचे असल्याचे यासंदर्भात बोलताना पोलीस आयुक्त कौशलकुमार पाठक म्हणाले. आपण सुशिक्षित असाल पण सुजाण, सुसंस्कृत नागरिक आहोत काय, याचा शोध आपणच घ्यायला हवा आणि वाहतूक समस्या दूर करायला जोमाने प्रयत्न करायला हवा. अपरिपक्व तरुण, व्यसनाधीन चालक आणि वाहन निष्काळजीपणे हाताळणाऱ्या बेदरकार वृत्तीची माणसे यांचा वाहन अपघातांचे प्रमाण वाढण्यात मोठा वाटा आहे. उपाय सोपा आहे. आपण तो प्रत्यक्षात आणला तरच त्याचे चांगले परिणाम समोर आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करायलाच हवे व इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करायला हवे, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 7:22 am

Web Title: need to get traffic regulation information at school level
टॅग Nagpur
Next Stories
1 राष्ट्रीय कृषी वसंत प्रदर्शनात औषध वनस्पतींचे सादरीकरण
2 ‘व्हॅलेंटाईन’ऐवजी ‘मातृपितृ पूजन’दिन साजरा करा
3 अंबाबरवा अभयारण्यात बिबटय़ाची शिकार, दोघांना अटक
Just Now!
X