News Flash

स्पर्धा परीक्षांसाठी गावोगावी ज्ञानमंदिरांची गरज

स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी, समाज मंदिराच्या धर्तीवर गावोगावी स्पर्धा परीक्षांसाठी ज्ञानमंदिरे उभारावीत, यांसह विविध ठराव येथे आयोजित चौथ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या

| January 15, 2013 12:10 pm

स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी, समाज मंदिराच्या धर्तीवर गावोगावी स्पर्धा परीक्षांसाठी ज्ञानमंदिरे उभारावीत, यांसह विविध ठराव येथे आयोजित चौथ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी करण्यात आले. तसेच पुढील संमेलन कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती आयोजक डॉ. आनंद पाटील यांनी दिली.
ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅन्ड रीसर्च ट्रस्टच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिर येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाचा समारोप राज्याच्या महसूल खात्याचे अपर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या उपस्थितीत झाला.
या वेळी क्षत्रिय यांनी स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासू प्रवृत्ती व जिद्द आवश्यक आहे. एक ध्येय निश्चित करावे म्हणजे यश निश्चित मिळेल, असे त्यांनी नमूद केले. कोठारी आयोगाच्या शिफारशीनंतर स्पर्धा परीक्षेचे स्वरूप बदलले गेले. या परीक्षेसाठी वाचन क्षमता जबरदस्त असावी. सामान्यज्ञानही पक्के असले पाहिजे. प्रशासन सेवेत विविधता आहे. यापुढील काळात प्रशासनाचा चेहरामोहरा बदलणार आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन आव्हानांचा जिद्दीने मुकाबला करा, असे आवाहनही क्षत्रिय यांनी केले.
दरम्यान, संमेलनाच्या समारोपप्रसंगी करण्यात आलेल्या ठरावात शासनाच्या ग्रंथालय योजनेत स्पर्धा परीक्षासंबंधी पुस्तकांना अधिकाधिक अनुदान मिळावे, शिक्षणसंस्थांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्या संस्थापातळीवर जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत व तसे परिपत्रक शासनाने काढावे, जे विद्यार्थी यूपीएससी व एमपीएससी परीक्षेच्या अंतिम परीक्षेपर्यंत जाऊनही यशस्वी झाले नसतील अशा नैराश्य आलेल्या विद्यार्थ्यांना शासनाने आधार द्यावा आदी ठराव करण्यात आले.
या वेळी उद्योजक अशोक खाडे यांनी जसे ‘नेचर तसे फ्यूचर’ असल्याचे सांगून विद्यार्थ्यांमधील उत्साह वाढविला. जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी कठोर परिश्रमाशिवाय यश नसल्याचे नमूद केले. स्पर्धा परीक्षांबाबत सुविधा देण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. संमेलनाध्यक्ष शेखर गायकवाड यांनी स्पर्धा परीक्षांबरोबरच जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र दिला.
समारोपप्रसंगी यशदाचे सहयोगी प्रा. प्रल्हाद कचरे आणि नाशिकच्या मुद्रांक विभागाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना क्षत्रिय यांच्या हस्ते आदर्श प्रशासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सरकारइतकी चांगली एनजीओ कुठेही नाही. प्रशासन हे उत्तम समाजसेवेचे माध्यम असल्याचे कचरे यांनी या प्रसंगी सांगितले. गुंडे यांनी प्रशासनात महिलांना चांगली संधी, सुरक्षितता व प्रतिष्ठा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक आनंद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 12:10 pm

Web Title: need to have the knowledge temples in villages for competitive exams
Next Stories
1 विद्यार्थिनींच्या छळ प्रकरणात अधिव्याख्यात्याला सौम्य शिक्षा
2 एसटीच्या २२ आगारांना ‘नकारात्मक’तेचे गतिरोधक
3 पतंगप्रेमींचा उत्साह शिगेला
Just Now!
X