दुष्काळी स्थिती व तीव्र पाणीटंचाईचा औरंगाबादकरांनी जवळून अनुभव घेतला आहे. यापुढे अशी वेळ येऊ न देण्यासाठी सर्वानीच आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पक्षीमित्र दिलीप यार्दी यांनी केले.
रोटरॅक्ट डिस्ट्रीक्ट आरआय ३१३२ तर्फे आयोजित रेन वॉटर हार्वेस्टिंग जनजागृती अभियानास शिवाजीनगर येथील सह्य़ाद्री हिल वसाहतीत सुरुवात झाली. त्यावेळी यार्दी बोलत होते. अभियानांतर्गत औरंगाबाद जिल्ह्य़ात ३ हजार ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा रोटरॅक्ट क्लबचा मानस आहे. या वेळी मैत्रेय मुदकवी, कम्युनिटी सव्र्हिस डायरेक्टर आशुतोष काटकर, परांजपे लेख मिठावाला आदी उपस्थित होते. काटकर म्हणाले की, पाण्याच्या टँकरवर दरवर्षी १०-२० हजार रुपये खर्च करण्यापेक्षा रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा लावण्यासाठी एकदा ठराविक रक्कम खर्च करून भविष्याच्या चिंतेतून मुक्त होणे अधिक चांगले आहे. ज्या लोकांना आपल्या घरी रेन वॉटर हार्वेस्िंटग करून घ्यायचे आहे, त्यांनी रोटरॅक्ट क्लबशी संपर्क करावा, असे आवाहन मैत्रेय मुदकवी यांनी केले.