पंचगंगा प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या ‘निरी’च्या अधिका-यांना मोजकीच ठिकाणे दाखवत कोल्हापूर महापालिका तत्पर असल्याचे चित्र निर्माण करणा-या अधिका-यांची ‘निरी’च्या जलतज्ज्ञ अश्विनी ढगे यांनी चांगलीच कानउघडणी केली.
पंचगंगा नदीप्रदूषणाबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवरील सुनावणीमध्ये नदी प्रदूषणाचा अभ्यास करून अहवाल देण्यासाठी न्यायालयाने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेची (निरी) नियुक्ती केली आहे. या संस्थेचे एक पथक कोल्हापूर येथे दाखल झाले आहे. हे पथक पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत पाहणी करणार आहे. कोल्हापूर ते कुरुंदवाड या सुमारे कि.मी. नदीपात्राचा अभ्यास या संस्थेकडून केला जाणार आहे.
पंचगंगा प्रदूषित करणा-या नाल्यांची पाहणी करण्यासाठी आलेल्या निरी संस्थेच्या सदस्यांना पालिका अधिका-यांंनी केवळ क्लोरीन प्लँट असलेलीच ठिकाणे दाखवत महापालिका प्रदूषण नियंत्रणासाठी तत्पर असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण जिल्हय़ातील सामाजिक संस्थांकडून नदी प्रदूषणाची माहिती घेतलेल्या शिवानी ढगे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सूर्यकांत डोके यांच्यासोबत पंचगंगेत मिसळणारे सर्व नाले पाहिल्याशिवाय कोल्हापूर सोडणार नाही असा निर्णयच आज जयंती नाल्यावर कोल्हापूर महापालिकेच्या अधिका-यांंना सुनावला. त्यांच्या या कणखर पवित्र्याने अधिकारीही अवाक झाले. मंगळवारी ढगे यांनी इचलकरंजी येथील काळा ओढा या नाल्याची पाहणी करून पाण्याचे नमुने घेतले. तेथील पाण्याचा रंग आणि प्रदूषण बघून ढगे यांनी प्रदूषण नियंत्रण अधिका-यांसमोरही प्रश्नचिन्ह उभे केले. आज सकाळपासून पाहणी करताना मात्र या पथकाने आक्रमक पवित्रा घेत पालिका अधिका-यांंना तुम्ही फक्त बरोबर या, कोठे काय पाहायचे ते आम्ही पाहू अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे महापालिकेचे आर. के. पाटील आणि अधिका-यांंना पुढे काही भाष्यही करता आले नाही.
निरी संस्थेच्या जलतज्ज्ञ शिवानी ढगे यांनी, मी प्रदूषणाची सर्व ठिकाणे बघितल्याशिवाय कोल्हापूर सोडणार नाही. तुम्ही काहीही बोलू नका, पंचगंगेचे प्रदूषण म्हणजे काय हे मी काल पाहिले आहे. तुम्ही फक्त रस्ते दाखवा, असे ठणकावत पंचगंगा प्रदूषणाबाबत दिशाभूल करणारी माहिती देणा-या महापालिकेच्या अधिका-यांना रस्त्यावर आणले.