04 March 2021

News Flash

पश्चिम विदर्भात कृषीआधारित उद्योगांकडे सपशेल दुर्लक्ष

राज्यात औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेल्या पश्चिम विदर्भात सर्वाधिक कापूस पिकवला जात असतानाही या भागात ‘टेक्स्टाईल पार्क’ उभारण्यात आलेले अपयश ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’च्या पाश्र्वभूमीवर चर्चेत आले आहे.

| February 26, 2013 02:51 am

राज्यात औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेल्या पश्चिम विदर्भात सर्वाधिक कापूस पिकवला जात असतानाही या भागात ‘टेक्स्टाईल पार्क’ उभारण्यात आलेले अपयश ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’च्या पाश्र्वभूमीवर चर्चेत आले आहे. नांदगावपेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील ‘सेझ’ रद्द झाल्याने आता या ठिकाणी कृषीआधारित प्रक्रिया उद्योगांसाठी सवलती देण्याची गरज आहे.
राज्यात होणाऱ्या कापसापैकी ६६ टक्के कापूस विदर्भात पिकवला जातो, त्यात सर्वाधिक वाटा अमरावती विभागातील पाच जिल्ह्य़ांचा आहे. पण, या भागात अजूनही ‘टेक्स्टाईल पार्क’ उभारण्याचे स्वप्न पूर्णत्वास येऊ शकलेले नाही. पश्चिम विदर्भात केवळ ७६ मोठे उद्योग आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अमरावती विभागासाठी एक आयटी पार्क मंजूर केला आहे. एकूण ४१ औद्योगिक वसाहतींमध्ये मध्यम आणि लघु उद्योगांची संख्या ५ हजार ६०७ या संख्येवर स्थिरावली आहे. यातील ३ ‘प्रॉडक्ट क्लस्टर’ जाहीर करण्यात आले, पण कृषीमाल प्रक्रिया उद्योगांच्या उभारणीसाठी अनुकूल वातावरण निर्मितीसाठी प्रयत्नच झालेले नाहीत.
२००८ मध्ये नांदगावपेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत ‘मल्टीप्रॉडक्ट सेझ’ मंजूर करण्यात आला. एल्डेको इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला १ हजार हेक्टर क्षेत्रात हे विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पण, चार वर्षांत एक इंचही काम पुढे सरकले नाही, कंपनीने गेल्या वर्षी एकाएकी माघार घेतली, ‘सेझ’ रद्द करण्यात आला, नंतर एमआयडीसीने देखील हालचाली केल्या नाहीत. नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत ‘टेक्स्टाईल पार्क’साठी सर्व पायाभूत सोयी उपलब्ध आहेत. ज्या १ हजार हेक्टर क्षेत्रावर ‘सेझ’ मंजूर करण्यात आला होता, त्यापेकी ५०० हेक्टर क्षेत्रावर कापसावर प्रक्रिया आणि वस्त्रोद्योग प्रकल्प उभारले जाऊ शकतात, असे औद्योगिक क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
सध्या नांदगावपेठच्या २ हजार ८०० हेक्टर औद्योगिक वसाहतीत केवळ १३ लघुउद्योग सुरू झाले आहेत. सुमारे ५४० हेक्टर जमिनीवर इंडिया बुल्सच्या वीज प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू आहे. उर्वरित जागा पायाभूत सुविधा उपलब्ध असूनही नुसती ओसाड पडलेली आहे. ‘सेझ’ जाहीर झाल्यानंतर या भागाच्या विकासाला चालना मिळेल, हा आशावाद फोल ठरला आहे. अमरावती विभागात कृषीमालावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांसाठी मोठा वाव असताना देखील गेल्या अनेक वर्षांत याकडे दुर्लक्ष झाले आहे. तेल गिरण्या आणि डाळ गिरण्यांखेरीज अन्य उद्योग विस्तारले गेले नाहीत. आता अमरावती विभागात वस्त्रोद्योगांशी संबंधित कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचे चित्र आहे.  
अमरावती विभागात कृषी प्रक्रिया उद्योगांना वाव- किरण पातूरकर
पश्चिम विदर्भात कृषीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांसाठी मोठा वाव आहे, कापूस, संत्री आणि सोयाबीनचे या भागात मोठय़ा प्रमाणावर उत्पादन होते, पण दुर्देवाने या भागात या शेतमालाशी संबंधित मोठे उद्योग नाहीत. नांदगावपेठ येथील औद्योगिक वसाहतीत ‘टेक्स्टाईल झोन’ची उभारणी झाली पाहिजे, असे मत फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीयल असोसिएशनचे विदर्भ अध्यक्ष किरण पातूरकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले. अमरावती, यवतमाळ आणि अकोला येथे विमानतळाची सुविधा आहे, पण या ठिकाणी रात्रीच्या वेळी विमानांचे उड्डाण आणि उतरवण्याची व्यवस्था नाही. ती व्यवस्था झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2013 2:51 am

Web Title: neglect on farm buisness in west vidharbha
Next Stories
1 वृद्धेच्या घरातील दरोडाप्रकरणी मोलकरणीसह दोघांना अटक
2 ‘आजही आदिवासी समाज मुख्य प्रवाहापासून उपेक्षितच’
3 बुलढाण्याचा आठवडी बाजार की कचरा डेपो?
Just Now!
X