News Flash

मनसेचे कृषी प्रदर्शन राज ठाकरेंकडून उपेक्षा

मनसेतर्फे लातूरमध्ये आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास आमदार अमित देशमुख यांनी भेट दिल्याने राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

| December 3, 2013 01:56 am

लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर काँग्रेसने अलिखित आघाडी केली होती. अनपेक्षित ‘लॉटरी’ लागल्याने लोहा नगरपालिकेत मनसेचा विजय झाला. तेव्हापासून ‘प्यादे’ हे ‘वजीर’ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. राज्याच्या राजकीय पटलावर मनसेचा होणारा वापर मराठवाडय़ातही निवडणुकीत पाहायला मिळाला. त्यानंतर मनसेतर्फे लातूरमध्ये आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास आमदार अमित देशमुख यांनी भेट दिल्याने राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे मुंबई, पुणे, नाशिकच्या त्रिकोणात अडकलेल्या राज ठाकरेंनी मराठवाडय़ाची उपेक्षाच केली असल्याची भावना मनसे कार्यकर्त्यांत पसरली आहे.
माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत अनपेक्षित रीत्या मनसेला घवघवीत यश मिळाले. निवडणुकीच्या निकालानंतर याची राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा झाली. मराठवाडय़ात मनसे हा दखलपात्र पक्ष ठरत असल्याची चर्चा होऊ लागली. या संधीचा लाभ उठवत लोहय़ातील यशाबद्दल मनसेचे प्रमुख राज ठाकरे लोहेकरांचे कौतुक करण्यासाठी स्वत: लोहय़ात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यावर राज ठाकरे यांनी पाणी फिरविले.
लातूर येथे २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर असे पाच दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यस्तरीय कृषिप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवसांत दीड लाख लोकांनी प्रदर्शनाला भेट दिल्याची अधिकृत नोंद झालेली आहे. नावे नोंदवण्यास वेळ न मिळाल्यामुळे तसेच प्रदर्शन पाहण्यास गेलेल्या लोकांची संख्या लाखांपेक्षा अधिक होती. प्रदर्शनाच्या काळात विविध स्टॉलवर सुमारे ५ कोटी रुपयांची उलाढाल झाली. या प्रदर्शनाला राजकीय भेद विसरून काँग्रेसचे आमदार अमित देशमुख, वैजनाथ िशदे, भाजपाचे माजी आमदार पाशा पटेल यांनी भेटी दिल्या. कसलेही अनुदान न घेता मनसेने स्वत:च्या ताकदीवर हे प्रदर्शन यशस्वी करून दाखवले. अहोरात्र परिश्रम करून मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्हय़ातीलच नव्हे तर परिसरातील लोकांना प्रवृत्त केले. मात्र, या पाच दिवसांच्या काळात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना लातूरला येण्यासाठी वेळ मिळाला नाही, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये आहे.
मराठवाडा मुंबईपासून दूर, विमानाची सोय नाही, अशा अडचणीतला आहे म्हणून आतापर्यंत जशी इतरांनी मराठवाडय़ाची उपेक्षा केली, तशीच उपेक्षा राज ठाकरे यांनीही केली. महत्त्वाच्या कार्यक्रमांकडे ते पाठ फिरवणार असतील तर नवनिर्माण कसे होणार, असा प्रश्न मनसेचे कार्यकर्ते दबक्या आवाजात विचारत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक ही महानगरे म्हणजे महाराष्ट्र आहे का?, राज ठाकरे हे शहरी भागाचे नेतृत्व आहे. त्यांना ग्रामीण भागाशी काहीही देणेघेणे नाही, अशी त्यांच्यावर राजकीय टीका होते. राज ठाकरेंनी मात्र माझा शेतकरी बांधव टी शर्ट व जीन पँट घालून ट्रॅक्टरवर बसलेला मला पहायचा आहे, अशी टिपणी केली होती. त्यानंतर लातूर येथे प्रदर्शनानिमित्त भेट द्यायला येऊ शकतील, असे वातावरण होते. मात्र, ते आले नाहीत.
काँग्रेसची मंडळी मनसेचा मराठवाडय़ात खुबीने वापर करत असल्याची राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे. लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी व माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना शह देण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोहय़ात मनसेला रसद पुरवली. अर्थात ती इतकी पुरवली गेली की त्यात मनसेच निवडून आली, अशी चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हवा तेव्हा राजकीय उपयोग काँग्रेसची मंडळी करून घेतात, असे चित्र नेहमी पाहावयास मिळते. या पाश्र्वभूमीवर आमदार अमित देशमुख यांनी कृषीप्रदर्शनाला दिलेली भेट लक्षात घेता त्यांना या अनुषंगाने विचारले असता, ते म्हणाले, आपल्या गावात मोठे प्रदर्शन भरलेले आहे. तुम्ही भेट द्यायला या, असे आमंत्रण दिल्यामुळेच आपण कृषिप्रदर्शनाला भेट दिली. याचा कसलाही राजकीय अर्थ काढला जाऊ नये, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. अर्थात, लोक मात्र सगळय़ाच बाबतीत जसा राजकीय विचार करतात, तसा या घडामोडींचाही राजकीय अर्थ काढला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 1:56 am

Web Title: neglect to agriculture exhibition by raj thakre
टॅग : Congress,Latur,Mns
Next Stories
1 जगण्यातील खरेपणाशिवाय कवी होणे नाही – प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी
2 चारठाणकर प्रतिष्ठानचे सेवागौरव पुरस्कार प्रदान
3 माध्यम व न्यायव्यवस्थेच्या सक्रियतेने लोकशाही टिकून- डॉ. अशोक कोल्हे
Just Now!
X