मुंबई महापालिकेच्या तीन मुख्य आणि अन्य सलग्न रुग्णालयांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. औषधे नसल्याने डॉक्टर आणि परिचारिकाही त्रस्त आहेत. मात्र त्याच वेळी रुग्णालयाबाहेरील औषधांच्या दुकानांत गर्दी वाढू लागली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे ‘युती होणार की तुटणार?’ आणि ‘आघाडी राहणार की बिघाडी होणार?’ या सर्वसामान्यांच्या दृष्टीने काडीचीही किंमत नसलेल्या मुद्दय़ांवरील गदारोळामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप, प्रशासन तसेच विरोधकांचेही दुर्लक्ष झाले आहे.
पालिकेच्या केईएम, सायन, नायर या मोठय़ा रुग्णालयांबरोबरच ठिकठिकाणच्या छोटय़ा संलग्न रुग्णालयांमध्ये रुग्णांना अत्यावश्यक औषधे मिळावीत अशी तजवीज पालिका प्रशासनाने करून ठेवली आहे. त्यासाठी प्रशासनाने औषधांची एक यादी तयार केली आहे. मात्र या यादीमधील काही इंजेक्शन, औषधाच्या गोळ्यांचा साठा काही रुग्णालयांमध्ये अपुरा, तर काहींमध्ये संपुष्टात आला आहे. रिंबरलॅक्टेट, सफ्लेटँक्सीम, मोनोसैफ, ऑठामेंटीन, एम.व्ही., इटकोफॉल, पेप्टॅज, पॅन फोस्टी, नॉर्मल सलाइन, डेस्ट्रोज ५%, अमिकासीन, डेक्स्ट्रोज प्लस नॉरमल सलाईन, डेस्ट्रोज २५%, सीप्रोफ्लोसीन (सीब्लॉक्स), इफकॉरलीन, अॅट्रोपीन, स्ट्रीटोकानेझ यांपैकी काही इंजेक्शनचा साठा संपुष्टात, तर काही इंजेक्शनचा तुटपुंजा साठा शिल्लक आहे. तसेच काही रुग्णालयांमध्ये अल्डोमेट, पॅन्टाप्रोझाल, डायकोफेनाक सोडिअम, पॅन-४० या गोळ्यांचा साठाही संपुष्टात आला आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना ही इंजेक्शन आणि या गोळ्या बाहेरील दुकानांतून आणण्यास सांगण्यात येत आहे.
पालिकेच्या रुग्णालयात येणारे बहुसंख्य रुग्ण आर्थिकदृष्टय़ा निम्न स्तरातील असतात. स्वस्त दरातील औषधे सध्या मिळत नसल्याने त्यांना भरुदड सोसावा लागत आहे. तर औषधटंचाईमुळे आसपासच्या दुकानांचे मात्र चांगलेच फावले आहे.
मुंबईकरांना आरोग्य सुविधा देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोटय़वधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. परंतु गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून पालिकेच्या बहुतांश रुग्णालयांतील काही औषधे गायब झाली आहेत. याबाबत प्रशासनाला पत्रही पाठविण्यात आले आहे. परंतु त्याला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. नवनियुक्त महापौर स्नेहल आंबेकर यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. मात्र त्यांनीही अद्याप या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे रुग्णांची परवड होत आहे. हा प्रश्न तातडीने सोडवावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुनील चिटणीस यांनी दिला आहे.

आचारसंहितेच्या नावाखाली विलंब!
 पालिका रुग्णालयांमधील प्रयोगशाळांमध्ये आवश्यक रसायने, तसेच रबरी साहित्याची चणचण निर्माण होऊ लागली आहे. ३.१२ कोटी रुपयांची विविध अत्यावश्यक रसायने आणि ३२.१३ कोटी रुपयांचे रबरी साहित्य खरेदी करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या सोमवारच्या बैठकीत सादर केला होता. मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करीत हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला. रुग्णालयांमध्ये या वस्तूंची तातडीने आवश्यकता असूनही या प्रस्तावास मंजुरी देणे टाळले गेले. पालिका रुग्णालयांना या साहित्यासाठी निवडणूक होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.