जलद, प्रदूषणविरहित, वाहतूक कोंडीमुक्त तसेच स्वस्त असे प्रवाशांना अनेक फायदे करून देणारी उरण (मोरा) ते मुंबई (भाऊचा धक्का) ही जलप्रवास सेवा सध्या मेरिटाइम बोर्डाच्या दुर्लक्षामुळे मोरा बंदरातील गाळामुळे त्रासदायक ठरू लागली आहे. त्यामुळे या मार्गावरून लाखोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आता काही हजारांवर आली आहे. उरण शहरातील मोरा बंदरातून दक्षिण मुंबईत पोहोचण्यासाठी अवघा अर्धा ते पाऊण तास लागतो. त्यामुळे सध्याच्या उरण ते मुंबईदरम्यानच्या रस्त्यामार्गे प्रवास करताना मुंबईत पोहोचण्यासाठी उड्डाणपूल उभारले असले तरीही दोन तासच लागत आहेत. त्याचप्रमाणे पन्नास ते पंचावन्न रुपयेही मोजावे लागत आहेत. त्याचप्रमाणे वाढत्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण, वाहतूक कोंडी आदींचाही त्रास सहन करावा लागतो. दुसरीकडे मात्र उरण ते मुंबई लाँचमार्गे प्रवास करीत असताना ३५ ते ४० रुपये मोजावे लागत असून रस्त्याच्या प्रवासापेक्षा निम्म्या वेळेत मुंबईत पोहोचता येते. मात्र या मार्गाने प्रवास करीत असताना येथील प्रवाशांना अनेक असुविधांना सामोरे जावे लागत आहे. यात मोरा जेटीवर वाहन पार्किंगची असुविधा, जेटीवरील खड्डे, विजेचे खांब असले तरी वीज गायब असल्याने अंधारातून करावा लागणारा धोकादायक प्रवास, त्याचबरोबर सर्वात मोठी समस्या म्हणजे मोरा बंदरात गाळ साठत असल्याने लाँच जेटीला लावताना लागणारा वेळ, कधी कधी लाँच गाळात रुतल्याने प्रवाशांना होणारा त्रास याकडे येथील प्रवाशांना सुविधा पुरविणाऱ्या महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे मत येथील प्रवाशांकडून व्यक्त केले जात आहे.