‘नेरळ-माथेरान’ गाडीचा डोंगरातून जाणारा मार्ग पावसाळ्यात धोकादायक होत असल्याने ही गाडी बंद केली जाते. यंदा पाऊस लवलकर आल्याने गुरुवारपासूनच या गाडीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. मात्र अमन लॉजपासून माथेरान स्थानकापर्यंत ही गाडी चालवण्यात येणार आहे. पावसाळ्यात या निसर्गरम्य मार्गावर दरड कोसळणे, रूळ वाहून जाणे आदी संकटे उद्भवतात. त्यामुळे ही गाडी पावसाळ्यादरम्यान बंद ठेवण्यात येईल. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी माथेरानच्या टापूवर गेल्यानंतर अमन लॉजपासून माथेरान स्थानकापर्यंत ही गाडी चालवली जाईल. अमन लॉजपासून सकाळी साडेनऊ वाजल्यापासून साधारणपणे दर तासाने ही गाडी माथेरान स्थानकाकडे रवाना होईल. अमन लॉजपासून शेवटची फेरी ३.५० वाजता असेल. तर माथेरान स्थानकापासून पहिली फेरी सकाळी ९ आणि शेवटची फेरी दुपारी ३.३० वाजता सुटेल.