दिवा-रोहा मार्गावरील रेल्वे गाडीमध्ये महिला आणि अपंगांसाठी असलेली अपुरी आसन व्यवस्था आणि प्रवाशांच्या होणाऱ्या ससेहोलपटीची दखल घेत शनिवारपासून नवी कोरी गाडी प्रशासनाने दिली आहे. त्यात महिलांसाठी प्रत्येकी २५ आसनांचे दोन डबे आहेत. याविषयी गुरुवारच्या ‘ठाणे वृत्तान्त’मध्ये याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या मार्गावर पूर्वी केवळ महिलांसाठी २० आसनांची व्यवस्था असलेला डबा होता. मात्र नव्या गाडीमध्ये इंजिनच्या दिशेला व गाडीचा शेवटचा डबा असे २५ आसनांचे दोन डबे महिला प्रवाशांसाठी राखीव करण्यात आले आहेत. त्यामुळे जुन्या गाडीच्या तुलनेत महिला प्रवाशांसाठीच्या आसन व्यवस्थेत भर पडली आहे. या निर्णयाचे प्रवासी संघटनांनी स्वागत केले असून अन्य सुविधाही अशाच तात्काळ उपलब्ध करून देण्याची विनंती प्रशासनाकडे केली आहे.
दिव्यातून रोह्य़ाकडे सकाळच्या वेळेत जाणाऱ्या गाडीच्या समस्या दिवसेंदिवस वाढत होत्या. या प्रवासी गाडीची सुरुवात झाल्यापासून वापरण्यात येणारी जुनी १२ डब्यांची गाडी आजतागायत वापरली जात होती. त्यामुळे प्रवाशांना गाडीची तुटकी आसन व्यवस्था, महिलांसाठी, अंपगांसाठी अपुरी आसने अशा समस्या कायमच भेडसावत होत्या. अस्वच्छ गाडीची अनेक वर्ष देखभाल दुरुस्ती होत नसल्याने विद्युत पुरवठा साहित्यही तुटले गेले होते. रेल्वे प्रशासनाकडे प्रवासी संघटनांकडून वारंवार पत्रव्यवहार केला जात होता. मात्र त्यास म्हणावी तशी दाद रेल्वे प्रशासनाकडून मिळत नव्हती. पनवेल-दिवा-बोईसर मार्गावर रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नवी गाडी दिल्यानंतर या जुन्या गाडीबद्दलच्या तक्रारींचा सूर अधिक उंचावला गेला होता. अखेर शनिवारी रेल्वे प्रशासनाने दिवावासीयांसाठी रोह्य़ाला जाण्यासाठीची नवी गाडी उपलब्ध करून दिली.
डब्यांची संख्या वाढवण्यात यावी..
दिवा-रोहा मार्गावर नवी गाडी उपलब्ध करून देण्यात आली असून ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या गाडीमध्ये जुन्या गाडीप्रमाणेच आठ डबे आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढते. त्या वेळात या गाडीत उभे राहून प्रवास करणे, गर्दीमुळे धक्काबुक्की करणे असे प्रकार वारंवार घडत असतात. त्यामुळे या गाडीचे डबे वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत, अशी अपेक्षा दिवा रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने व्यक्त केली जात आहे. तसेच दिवा स्थानकातील असुविधांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न प्रवाशांनी केला आहे.