News Flash

जायकवाडी पाणीप्रश्नावर नवी समिती होणार

जायकवाडीच्या पाणीप्रश्नावर लढा देण्यासाठी सर्वपक्षीय ४० जणांची समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून १७ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वाभिमानी मराठवाडा’ महिना

| September 2, 2013 01:40 am

जायकवाडीच्या पाणीप्रश्नावर लढा देण्यासाठी सर्वपक्षीय ४० जणांची समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून १७ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वाभिमानी मराठवाडा’ महिना पाळण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी एक लाख पत्रके प्रकाशित करुन घरोघरी ती वितरित केली जाणार आहेत. या प्रश्नाचे गांभीर्य कळावे, असा या उपक्रमाचा हेतू आहे.
 जायकवाडी जलाशयातील पाणीसाठय़ासंदर्भात संघर्ष कृती समितीच्या वतीने रविवारी पत्रकार भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी शिवसेना व भाजपचे पदाधिकारी वगळता अन्य राजकीय पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी रविवारी आयोजित बठकीस उपस्थित होते. या बठकीत नगर जिल्ह्यातील चार तालुके व चार पुढारी यांना लक्ष्य करून त्यांच्या विरोधात जनआंदोलन केले जाईल, असे जायकवाडी कृती संघर्ष कृती समितीचे संयोजक जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, अकोला, संगमनेर व कोपरगाव या तालुक्यात पाणी वळविले जाते. त्यामुळे शंकरराव कोल्हे, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील व मधुकर पिचड यांच्या विरोधात आंदोलन उभारले जाणार आहे. वरील धरणातून पाणी न सोडल्यास १७ सप्टेंबरला पालकमंत्र्यांच्या ऐवजी स्वातंत्र्यसनिकाकडून ध्वजारोहण करावे, अशी मागणी केली जात आहे.
 या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब कोळगे म्हणाले, की पाणी निर्सगाचे असते. जायकवाडीसाठी सतत संघर्ष करावा लागतो. पण मराठवाडय़ात नेतृत्व नाही. मराठवाडय़ातील माणसाला जागे राहण्याची गरज आहे. निजामापेक्षाही जास्त अन्याय केला जात आहे. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सराटे यांनी या लढय़ाला पाठिंबा असल्याचे सांगत मराठवाडय़ातील जनता सहन करते, याचा फायदा घेतला जात आहे. तर शेतकरी संघटनेचे कैलास तवार म्हणाले, जायकवाडी धरण औरंगाबादसाठी पिण्याच्या पाण्यापुरते मर्यादित नाही. त्यामुळे पाणी मिळविण्यासाठी सर्वपक्षीय जनआंदोलन व्हायला हवे. शेतकऱ्याला सर्व पक्ष आडवे येतात. व्यापारी नोकरदार यांना मात्र कोणी आडवे येत नाही. तर मनसे शहराध्यक्ष सुमित खांबेकर यांनी निदर्शने, उपोषणाने प्रश्न सुटत नाही. या प्रश्नावर ‘खळ्ळ खटय़ाक’ पद्धतीने आंदोलन करण्याची गरज आहे. पाणीप्रश्नी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी नव्याने नेमण्यात आलेल्या समितीची बठक होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर जिल्ह्याचे अध्यक्ष अंबादास कोरडे यांनी नगर जिल्ह्यातील मंत्री नुसतीच बडबड करतात, त्यामुळे जायकवाडीत पाणी देणे कायद्याने गरजेचे आहे असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 1:40 am

Web Title: new committee become jayakwadi water issue
टॅग : Aurangabad,Jayakwadi
Next Stories
1 आरक्षणाच्या मुद्दय़ावर मेटे पवारांवर घसरले
2 अपंग वसतिगृहात राष्ट्रवादीचा हल्लाबोल
3 राष्ट्रवादीची परभणीत आज दहीहंडी स्पर्धा
Just Now!
X