राजीव गांधींचे नाव देण्याच्या प्रस्तावास विरोध
धारावी येथे बांधण्यात आलेल्या मुंबई शहर जिल्ह्याच्या क्रीडा संकुलाचे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले आणि लागलीच नामकरणाचा वादही सुरू झाला. उद्घाटनावेळी या क्रीडा संकुलाला दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव देण्याची मागणी महिला व बालविकास मंत्री वर्षां गायकवाड यांनी केली आणि मुख्यमंत्र्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे सर्वच प्रकल्पांना गांधी-नेहरू घराण्यातील नेत्यांची नावे द्यायची काय असा सवाल करत भाजपाने त्यास आक्षेप घेतला आहे.
उद्घाटन समारंभावेळी या क्रीडा संकुलाला दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव देण्याची मागणी वर्षां गायकवाड यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही त्यास प्रतिसाद दिला. राजीव गांधी यांनी युवकांच्या सर्वागणी विकासासाठी कार्य केले. त्यामुळे या क्रीडा संकुलाला राजीव गांधी यांचे नाव देता येईल आणि नंतर यापुढच्या क्रीडा संकुलांना मोठय़ा खेळाडूंची नावे देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनाच्या वेळी स्पष्ट केले.
धारावीच्या क्रीडा संकुलाला राजीव गांधी यांचे नाव देण्याच्या हालचाली सुरू होताच मुंबई भाजपाने त्यास विरोध केला. गांधी-नेहरू कुटुंबातील लोकांनी देशासाठी काम केले असले तरी सर्वच प्रकल्पांना त्यांचेच नाव देणे चुकीचे आहे. हे काँग्रेसचे राजकारण आहे. त्यामुळे राजीव गांधी यांचे नाव देण्यास आमचा विरोध राहील, असे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे पूर्व मुक्त मार्गानंतर आता धारावी क्रीडा संकुलाच्या नावावरून वाद सुरू झाला आहे.

प्रत्येक जिल्’ााच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याच्या राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत मुंबई शहर जिल्’ाासाठी धारावीत हे क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. बांधकामाची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पार पाडली असून संकुलासाठी तब्बल २१ कोटी १८ लाख रुपये खर्च आला आहे.कबड्डी, कुस्तीसाठी मॅट, बॅडमिंटन कोर्ट, जलतरण तलाव, फुटबॉल मैदान, अ‍ॅथलेटिक्सच्या विविध खेळांसाठी सोयीसुविधा या क्रीडा संकुलात आहेत.