डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. टाटा सामाजिक व संशोधन संस्था व विद्यापीठांतर्गत यासाठी करार करण्यात आला आहे. हा उपक्रम महाविद्यालय स्तरावर तीन वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये रोजगारक्षमता निर्माण व्हावी, संभाषणकौशल्य विकसित व्हावे, बदलत्या अर्थव्यवस्थेत आवश्यक असणारे गुण त्याच्या अंगी यावेत, यासाठी विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. टाटा सामाजिक संस्था व विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या उपक्रमासाठी चार महाविद्यालये निवडण्यात आली असून यात विवेकानंद महाविद्यालय, वसंतराव नाईक महाविद्यालय, शिवछत्रपती महाविद्यालय व अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालयाचा समावेश आहे. टाटा सामाजिक व संशोधन संस्था व विद्यापीठात करण्यात आलेल्या कराराच्या वेळी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. राजेश करपे आणि टाटा सामाजिक व संशोधन संस्थेतर्फे डॉ. पेपीन, डॉ. राम राठोड आदींची उपस्थिती होती.