मोकळ्या जागा, हिरवीगार उद्याने ही शहराची फुप्फुसे मानली जातात. एखाद्या शहरात गगनचुंबी इमारतींची संख्या किती यापेक्षा तेथील रहिवासी मोकळा श्वास घेऊ शकतील, अशा उद्याने आणि मैदानांची अवस्था कशी आहे यावर त्या ठिकाणच्या नियोजनाचा ढाचा ठरत असतो. नेमक्या याच प्रकरणाकडे वर्षांनुवर्षे पाठ फिरवल्यानंतर ठाणे महापालिकेने उशिरा का होईना, शहरातील उद्याने आणि मैदानांच्या विकासासाठी सविस्तर असा आराखडा तयार केला असून काही ठिकाणी मोकळ्या व्यायामशाळा उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
शहराच्या विकास आराखडय़ास राज्य सरकारने २००३ मध्ये हिरवा कंदील दाखविला. गेल्या ११ वर्षांत या नियोजनाचे अक्षरश: तीनतेरा वाजले असून अनेक मोकळ्या जागांवर बेकायदा इमारती आणि चाळी उभ्या राहिल्याचे चित्र दिसत आहे. मूळ शहरापेक्षा काहीसे वेगळे भासणाऱ्या घोडबंदर परिसराचा विकास करतानाही महापालिकेने ठोस असा नियोजन आराखडा राबविला नाही. नवी मुंबईच्या धर्तीवर या भागाचा स्वतंत्र विकास आराखडा तयार केला जावा, असे काही नियोजनकर्त्यांचे मत होते. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही. त्यामुळे मैदाने, उद्यानांसाठी आरक्षित असलेल्या अनेक मोकळ्या जागा भूमाफियांनी एव्हाना गिळंकृत केल्या आहेत.

६० लाखांचे अंदाजपत्रक
ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागाने दुरुस्तीचा सविस्तर आराखडा तयार केला असून त्यासाठी सुमारे ६० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या आराखडय़ातील पहिल्या टप्प्यात नौपाडा परिसरातील १४ उद्यानांचे रूपडे पालटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये जिजाऊ, पु. ल. देशपांडे, लोकमान्य टिळक, हुतात्मा शिरीषकुमार, घाणेकर उद्यानांची डागडुजी केली जाणार आहे.

मैदानांचाही विकास
ाहापालिकेने मैदाने विकसित करण्यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. मैदानासाठी आरक्षित असलेल्या मोकळ्या जागांभोवती सुरक्षा भिंत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून याच ठिकाणी मोकळी व्यायामशाळा तयार करण्याचे ठरविले आहे.