News Flash

गिरणा धरणाच्या दरवाजांना चढणार नवीन साज

तब्बल चार दशकांहून अधिक काळापासून मालेगाव व नांदगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील पाण्याची गरज भागविणाऱ्या गिरणा धरणांच्या दरवाजांना लवकरच नवीन साज चढविण्यात येणार आहे.

| November 22, 2013 08:39 am

तब्बल चार दशकांहून अधिक काळापासून मालेगाव व नांदगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील पाण्याची गरज भागविणाऱ्या गिरणा धरणांच्या दरवाजांना लवकरच नवीन साज चढविण्यात येणार आहे. जुनाट झालेल्या दरवाजांच्या विशेष दुरूस्तीसाठी सुमारे चार कोटींचा निधी शासनाने उपलब्ध केला आहे.
नाशिक व जळगाव जिल्ह्याच्या सीमारेषेवर वसलेल्या नांदगाव तालुक्यात उत्तर महाराष्ट्रातील हे महाकाय धरण आहे.
हा परिसर दुष्काळी म्हणून ओळखला जातो. परिसरातील पाण्याची निकड भागविण्यासाठी १९६९ मध्ये गिरणा धरण बांधण्यात आले. या धरणातून मालेगाव शहर, नांदगाव तालुक्यातील पाणी पुरवठा योजना आणि जळगाव जिल्ह्यातील शेतीला पाणी उपलब्ध होते. या धरणाच्या दरवाजा दुरूस्तीला प्रदीर्घ कालावधी लोटूनही काही केल्या मुहूर्त सापडत नव्हता. मुळात, जलसंपदा विभागाकडे निधीची चणचण असल्याने हे काम रखडले होते. त्याचा वनवास आता संपुष्टात आला आहे.
गिरणा प्रकल्पाच्या विविध जलद्वारांच्या विशेष दुरुस्ती कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. धरणाच्या वक्रदारांचे ‘रबरसील’ खराब झाल्यामुळे शेकडो लिटर पाणी अव्याहतपणे वाहत असते. हा अपव्यय या कामातून टाळला जाईल. वक्रदारांचे रबरसील बसविणे, वायररोप बसविणे, वक्रद्वाराचे गंजरोधक रंगकाम करणे, सेवाद्वाराचे रबरसील बदलविणे व रंगकाम करणे, सेवाद्वारांसाठी विद्युतचलीत यंत्रणा कार्यान्वित करणे आदींचा विचार विशेष दुरूस्तीचा कामात करण्यात आला आहे.
गिरणा धरणाच्या विशेष दुरुस्तीचे काम यांत्रिकी विभागाकडून करून घ्यावे लागणार आहे. १८ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव धरण आहे. त्याची निर्मिती झाल्यापासून आजतागायत ते केवळ सहा ते सात वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे. यंदा या धरणात ४५ टक्के इतका जलसाठा आहे. गिरणा पूर्ण क्षमतेने भरले नाही तरी त्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपरोक्त भागात उपलब्ध होते. कारण, त्याची क्षमता इतकी मोठी आहे की काही अंशी भरले तरी त्यावर मालेगाव, नांदगाव व
जळगाव जिल्ह्याची तहान सहजपणे भागते. या भागासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या धरणाच्या दरवाजा दुरुस्तीची कामे होणे आवश्यक होते. त्याचा मार्ग या निमित्ताने खुला झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 8:39 am

Web Title: new doors to girna dam
टॅग : Nashik
Next Stories
1 ‘एमआयएम’ व समाजवादी पक्षाच्या प्रवेशाने काँग्रेस-राष्ट्रवादी अडचणीत
2 मालेगाव तालुक्यात नदीजोड कालव्यांच्या कामांचे सर्वेक्षण
3 अमळनेर पालिका कर्मचाऱ्यांवर सीसीटीव्हीची नजर
Just Now!
X