कट्टय़ावर बसून मुलींची छेड काढणाऱ्या रोमिओंची मानसिकता, त्यांची बसण्याची, फिरण्याची, चालण्याची तऱ्हा, सांकेतिक भाषा, वेळा, गाडीवरून जाताना हॉर्न वाजविण्याच्या पद्धती आणि नव-नव्या शब्दांचे शोध लक्ष्मीकांत देशमुख या तरुणाने ‘कट्टय़ावरची थट्टा’  या नाटकातून थेट रंगभूमीवर आणले आहे. विनोदी व मुलींबद्दलचा असलेला दृष्टिकोन बदलण्यासाठीचा आशय देणारं तब्बल वीस पात्रांचं नाटक शहरातीलच नवोदित कलावंतांना घेऊन साकारलं गेलं आहे.
जिल्हय़ातील मकरंद अनासपुरे यांच्यापासून वामन केंद्रे यांच्यापर्यंत अनेकांनी आपल्या कलेच्या जोरावर अटकेपार झेंडा रोवला. मराठी चित्रपटात अनेक कलावंत आघाडीवर आहेत. कोणतीही तांत्रिक प्रशिक्षणाची सोय नसताना कलावंत घडत आहेत. शिरूर तालुक्यातील गातशिरापूर येथील शेतकरी कुटुंबातून लक्ष्मीकांत बालपणापासूनच नाटकाकडे ओढला गेला. शाळेच्या रंगमंचावर संधी मिळालेल्या या तरुणाने करीअरसाठी नाटकच निवडले. २००९ मध्ये पुणे येथे ड्रामा क्लासेसला प्रवेश घेतला. ‘गाढवाचं लग्न’ नाटकाचे संचालक राजू फुलकर यांच्याशी भेट झाल्यानंतर लक्ष्मीकांतला अमोल कोल्हे यांच्या ‘छत्रपती शंभुराजे’ महानाटय़ात पहिली संधी मिळाली. ‘अरे आवाज कोणाचा’ चित्रपटातही कार्यकर्त्यांची भूमिका लक्ष्मीकांतने साकारली.
शहरातील खासगी क्लासेसमध्ये काम करणाऱ्या लक्ष्मीकांतसमोर एक मुलगी घाबरलेल्या अवस्थेत येऊन उभी राहिली. एका मुलाने दिलेल्या चिठीने ती गांगरून गेली होती. त्यातून लक्ष्मीकांतला मुलांच्या कट्टय़ावरील थट्टेवरच्या नाटकाची भन्नाट कल्पना सुचली. दोन वर्षांत या कट्टय़ांचा बारकाईने अभ्यास करून हे नाटक लिहिले गेले. कट्टय़ावरील मुलांची मानसिकता, मुलींबद्दलची भावना, बसण्याची ठिकाणे, पद्धती, खाणाखुणा, फिरण्याची, चालण्याची पद्धत, गाडीवरून जाताना हॉर्न वाजवण्याचेही बारकावे टिपले.
कट्टय़ावर दोन प्रकारची मुले असतात. एक सर्वसाधारण चांगला विचार करणारी, तर दुसरे छेड काढण्याच्या मानसिकतेतील. या दोन्ही प्रकारच्या मुलांचे पात्र अत्यंत खुबीने रेखाटले असून, कट्टय़ावरच्या मुलांची मानसिकता बदलली तर मुलींसाठीच्या कायद्याची गरजच राहणार नाही, असा संदेशच त्यातून देण्यात आला आहे. विनोदी ढंगाने रंगवलेल्या या नाटकात वरद हा मुलगा वेगवेगळ्या प्रकारे सात शिट्टय़ा खुबीने वाजवतो. सावरकर महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या ओमप्रकाश झंवर, आदित्य महाविद्यालयातील प्रा. अनुराधा कुलकर्णी, दुकानात नोकरी करणारा अमोल रासवे, दहावीत शिक्षण घेणारी स्वाती आनेराव, तसेच ऋषी नरवडे, जयश्री सिरसाट, निखील केंजळे, झहीर पटेल, कृष्णा दाभाडे, अक्षय रोमण, राजेंद्र गुजर, अजय कुलकर्णी, दुग्रेश कुलकर्णी, अमरजित देशमाने, जया फाळके, अतुल ठोकळ या सामान्य कुटुंबातील तरुणांनी वेगवेगळी पात्रे साकारली आहेत.
पुण्या-मुंबईत जाऊन करीअर करणे सोपे मानले जाते. मात्र, आपल्याच शहरात सुविधांची आबाळ असताना लक्ष्मीकांत देशमुखने जिद्दीने रंगमंचावर साकारलेल्या नाटकाने कलावंतांच्या स्थानिक दुनियेला नवा आयाम दिला आहे.