केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी लोकार्पण होणारा येथील उड्डाणपूल त्याच्या बांधकामासह अनेक वैशिष्टय़े जपून आहे. या वैशिष्टय़ांची थोडक्यात माहिती.
*  मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेला ६.१ किलोमीटर लांबीचा हा उड्डाण पूल राज्यातील सर्वाधिक लांबीचा  ठरणार आहे. या उड्डाण पुलासाठी ‘स्टरटेड’ तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या तंत्राचा वापर आशियात दुसऱ्यांदा तर देशात प्रथमच झाला आहे. या पुलाचे आयुष्य शंभर वर्षांचे आहे.
*  मुंबई नाका ते आडगाव नाका दरम्यानचा हा उड्डाणपूल चारपदरी आहे. त्याला गरवारे पॉईंट येथून अन्य आकाराने लहान असणारे उड्डाणपूल जोडले जातात. त्यात भुजबळ फार्म ते लेखानगर, लेखानगर ते स्टेट बँक चौक, स्टेट बँक चौक ते पाथर्डी फाटा, फाळके स्मारक ते गरवारे पॉईंट या उड्डाण पुलांचा समावेश आहे.
*  मुंबई नाका ते गरवारे पॉईंट या परिसरात वाहतुकीसाठी १२ पदरी मार्ग उपलब्ध होईल. मुंबई नाका ते आडगाव नाका दरम्यानचा उड्डाण पूल चारपदरी आहे. या पुलाखालून दोन्ही बाजुंनी चार पदरी महामार्गाचा रस्ता आहे. तर त्याच्या बाजूला चारपदरी सव्‍‌र्हिस रोड आहे.
* उड्डाण पुलाच्या खालून नाशिकहून पुण्याकडे जाण्यासाठी द्वारका येथे उपरस्ता ठेवण्यात आला आहे.
*  शहरातील अंतर्गत भागातील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी उड्डाण पुलाच्या खालून इंदिरानगर, राणेनगर, फाळके स्मारक, विल्होळी, रायगडनगर या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यात आले आहेत. शहराव्यतिरिक्त विल्होळी, रायगडनगर, वाडिवऱ्हे,  पिंपळगावजवळील चिंचखेड फाटा, ओझर येथेही महामार्गावर अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
*  महाकाय उड्डाण पुलासाठी एकूण १७२ अवाढव्य खांब उभारण्यात आले आहेत.
*  उड्डाण पुलाच्या बांधकामात ३८ हजार टनहून अधिक सिमेंट तर तब्बल ११ हजार टन स्टीलचा वापर
* महापालिका क्षेत्रातील २१ किलोमीटरच्या विस्तारीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाच्या    कार्यक्षेत्रात    येणाऱ्या पाणी पुरवठा वाहिन्या, भूमिगत गटारीचे    पाईप    व    वीजवाहक   तारा स्थलांतरीत करण्यासाठी ५८.०२ कोटी रूपये खर्च केले.
*  महामार्ग विस्तारीकरणाच्या गोंदे-नाशिक-पिंपळगाव या टप्प्यातील एकूण खर्चाच्या जवळपास ८० टक्के म्हणजे ७०९.५२ कोटी रूपयांचा खर्च महापालिका क्षेत्रातील या उड्डाणपुलासह अन्य कामावर झाला आहे. या खर्चात सव्‍‌र्हिस रोडचा खर्च समाविष्ट नाही.
* या उड्डाण पुलामुळे नाशिकमधून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न बहुतांश प्रमाणात निकाली निघू शकेल.