कर्करोगाचे निदान झाल्यानंतर रुग्णावरील पुढील वैद्यकीय उपचार महत्वाचे असतात. कर्करोगाचे निदान ते उपचार या दरम्यान रुग्णाच्या मनातील भीती, निराशा, तणाव दूर करून त्याच्या मनात नवी उमेद आणि जिद्द निर्माण करणे आवश्यक असते आणि हेच काम कर्करुग्ण आणि कर्करोगाच्या क्षेत्रात गेली काही वर्षे काम करणाऱ्या विजी व्यंकटेश या करत आहेत. विजी यांनी आपले लक्ष कर्करोग झालेली मुले आणि त्यांच्या पालकांवर केंद्रीत केले असून पुस्तकाचे अभिवाचन आणि संवादाच्या माध्यमातून त्या या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात नवी उमेद निर्माण करत आहेत.विजी यांनी लिहिलेल्या आणि द मॅक्स फाऊंडेशन यांनी प्रकाशित केलेल्या ‘मॅक्सीमो अ‍ॅण्ड द बीग सी’ या पुस्तकाच्या अभिवाचनाचे आणि त्यानंतर कर्करोग झालेल्या मुलांशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधून कर्करोगाविषयी वाटणारी भीती, समज-गैरसमज आणि मुख्य म्हणजे या मंडळींच्या मनात आत्मविश्वास जागविण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. टाटा मेमोरिअल रुग्णालयातील कर्करोग झालेली लहान मुले आणि त्यांच्या पालकांसमोर नुकताच या पुस्तकाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम झाला.
या उपक्रमाविषयी ‘वृत्तान्त’ला माहिती देताना विजी व्यंकटेश म्हणाल्या की, या प्रकारचा पहिला उपक्रम आपण कोलकोता येथे केला होता. तेथे मिळालेल्या प्रतिसादानंतर हैदराबाद, दिल्ली, चेन्नई, पुणे आदी ठिकाणच्या विविध रुग्णालयात तसेच बुक स्टोअर्समध्ये आपण हा कार्यक्रम केला. वैद्यकीय वर्तुळात कर्करोगाला ‘बीग सी’ या नावाने ओळखले जाते. आपण लिहिलेल्या या पुस्तकात चिमणी आणि मांजर यांच्या गोष्टीतून मी हे स्पष्ट केले आहे. यात मांजर हा प्राणी कर्करोगाचा प्रतिकात्मक रूप तर चिमणी म्हणजे कर्करोग झालेली लहान मुले असे दाखविले आहे.ही चिमणी सारख्या छोटय़ा पक्षाची कहाणी आहे. या चिमणीला स्वत:बद्दल आत्मविश्वास नसतो. आपण आकाशात उडू शकत नाही, असे तिला वाटत असते. एके दिवशी तिच्यापेक्षा लहान असलेल्या चिमणीचा जीव एक मांजर घेण्याच्या तयारीत असल्याचे तिला दिसते. तेव्हा ती आपल्यापेक्षा लहान असलेल्या त्या चिमणीचा जीव वाचवायचा निश्चय करते आणि मांजरीच्या तावडीतून तिची सुटका करून तिला जीवदान देते. या गोष्टीच्या माध्यमातून लहान मुले आणि त्यांच्या पालकांच्या मनात या रोगाविषयी असलेली भीती दूर करणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे, कर्करोगासारख्या संकटावर धैर्याने मात करून जीवनाला जिद्दीने सामोरे जाणे मला अपेक्षित आहे. पुस्तकातील अन्य रुग्णांचे प्रेरणादायक अनुभव आणि त्यांच्याशी झालेल्या संवादानंतर समोरून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आणि तेच महत्वाचे असल्याचेही विजी यांनी सांगितले.
मूळ इंग्रजीत असलेल्या या पुस्तकाचा मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आदी भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. अभिनेता सलमान खान याला या उपक्रमाविषयी सांगितल्यानंतर त्याने पाच हजार पुस्तके विकत घेतली. विविध शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयात आपल्याला हा कार्यक्रम करायचा असल्याचेही विजी म्हणाल्या.
आत्तापर्यंत १४ रुग्णालयातून आणि ६ बुकस्टोअर्स मध्ये हा कार्यक्रम झाला असून येत्या १४ नोव्हेंबर रोजी मुंबईत जसलोक रुग्णालयात हा कार्यक्रम होणार आहे. एका रुग्णालयात कार्यक्रम झाल्यानंतर काही दिवसांनी कर्करोग झालेल्या त्या लहान मुलाचे वडील मला भेटायला आले. ते म्हणाले कर्करोग झाल्याचे समजल्यानंतर माझा मुलगा कोणाशी बोलत नव्हता की कोणामध्ये मिसळत नव्हता. तुमच्या कार्यक्रमामुळे तो पुन्हा बोलू लागला आहे. माझ्यासाठी असे क्षण खूप समाधान देऊन जात असल्याचेही त्या म्हणाल्या.
अधिक माहितीसाठी संपर्क द मॅक्स फाऊंडेशन ०२२-६६६०३३२०/२१