घरकुल घोटाळ्यामुळे आधीच त्रस्त असलेल्या महापालिकेकडून केंद्र सरकारच्या झोपडपट्टीमुक्त शहर योजनेंतर्गत आणखी एक घरकुल योजना राबविली जाण्याचा प्रस्ताव आहे. राजीव आवास योजनेंतर्गत ही योजना असून २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या महपालिकेच्या विशेष महासभेत या विषयावर चर्चा होणार आहे.
घरकुल योजनेचे नाव काढले तरी जळगावचे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना आता धास्ती वाटत आहे. तत्कालीन पालिकेने गरिबांच्या हितासाठी आणि झोपडपट्टीमुक्त शहर या चांगल्या उद्देशाने राबविलेल्या योजनेत कोटय़वधी रुपयांचा घोटाळा झाला. आणि पोलिसात गुन्हा दाखल होऊन अनेक मान्यवरांना तुरुंगाची हवा खावी लागली. आ. सुरेश जैन हे सुमारे २२ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, जिल्ह्य़ाचे माजी पालकमंत्री आ. गुलाब देवकर यांच्यावरही तुरुंगात जाण्याची टांगती तलवार आहे. माजी महापौर प्रदीप रायसोनी हेही सुमारे दोन वर्षांपासून कारागृहातच असून याशिवाय अनेक आजी माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, माजी महापौरांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती.
आता शहरातील तांबापुरा आणि फुकटपुरा परिसरातील झोपडपट्टी धारकांसाठी केंद्र शासनाच्या राजीव आवास योजनेंर्तगत घरकुल उभारण्याचा प्रस्ताव असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या परिसरातील सुमारे चार हजार झोपडय़ांच्या सर्वेक्षणाचे काम त्यासाठी पूर्ण करण्यात आले आहे.