पायऱ्या चढताना किंवा उतरताना अपंगांना होणारा त्रास दूर करण्यासाठी ‘लोकमान्य टिळक अभियांत्रिकी महाविद्यालया’च्या सहा विद्यार्थ्यांनी एक छोटासा ‘व्हेइकल रोबो’ तयार केला आहे. काही जुजबी सुधारणा करून त्याचा वापर माणसाला पायऱ्या चढणे किंवा उतरविण्यासाठी करता येणार आहे.
महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे यंत्र भविष्यात माणसांबरोबरच कारखान्यांमध्ये सामान चढविण्यासाठीही वापरता येऊ शकेल, असा विद्यार्थ्यांचा दावा आहे. सध्या हे यंत्र फक्त २० किलोपर्यंतचे वजन उचलू शकते. पण सुधारणा केल्यानंतर त्याची क्षमता चांगलीच वाढविता येऊ शकेल, असे या रोबोच्या जनकांपैकी एक िहमाशू टेंभेकर सांगतो.
या ‘स्टेअर क्लायम्बिंग व्हेइकल’ रोबोचा सांगाडा लोखंडाचा आहे. त्याचे वजन ३५-४० किलो आहे. हे यंत्र २० किलोपर्यंतचे वजन घेऊन पायऱ्या चढू शकते. या रोबोत ऊर्जेसाठी १२ व्होल्टच्या आणि ३६ अॅम्पिअरच्या दोन बॅटऱ्या वापरण्यात आल्या आहेत. हा रोबो कोणत्याही प्रकारच्या पायऱ्यांवर काम करू शकतो. त्याचा वेग ताशी सहा किलोमीटर असून तो जागीच ३६० अंशात फिरू शकतो, अशी माहिती हिमांशूने दिली.
हा रोबो तयार करणाऱ्या चमूत हिमांशूसोबत विनीत ताम्हणकर, दीपक िशदे, निलेश पाटील, अजित बग्रे, जितेश माने यांचाही समावेश असून त्यांना डॉ. संतोष दळवी, डॉ. विवेक याकुंडी आणि समीर राजर्षी यांनी मार्गदर्शन केले आहे.