उरण तालुक्याच्या पूर्व व पश्चिम विभागाला जोडणारा नवीन खोपटा पूल एप्रिलअखेर कार्यान्वीत होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता आर.ए.राजन यांनी दिली.
स्वातंत्रोत्तर काळात औद्योगिकदृष्टया प्रगत अशी ओळख असणाऱ्या उरण तालुक्याचा पूर्व विभाग कोणतेही दळणवळणाचे साधन नसल्याने विकासापासून वंचितच राहिला. तालुक्याच्या पूर्व व पश्चिम विभागाला जोडण्यासाठी खोपटा खाडी पुलावर ऐशीच्या दशकात माजी मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांनी खोपटा पुलाला मंजूरी दिली होती.
मात्र हा पूल तयार होऊन रहदारीसाठी खुला होण्यासाठी तब्बल पंधरा वर्षांचा कालावधी लागला होता. त्याचीच पुनरावृत्ती या  खाडीवर उभारल्या जात असलेल्या नवीन खोपटा पुलाबाबत झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने खोपटा खाडीवर पूल उभारल्याने खोपटय़ासह उरणच्या पूर्व विभागाच्या विकासाचा मार्ग खुला होऊन औद्योगिक विकासाचे वारे वाहू लागले. पंधरा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या जुन्या खोपटा पूलावरील वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने याच खाडीवर नवीन पुलाचे काम सुरू झालेले आहे.
२०११ पर्यंत पूर्ण होणाऱ्या या पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने खोपटय़ाचा विकासही रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पुलाचे काम जलद गतीने व्हावे, अशी अपेक्षा खोपटे येथील नागरीक संजय ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.