कोकण रेल्वेमार्गावरून प्रवास करणाऱ्या आणि प्रवास करण्यास इच्छुक असणाऱ्या प्रवाशांच्या अनेक शंकांचे निरसन करण्यासाठी कोकण रेल्वे आता ‘अ‍ॅप’ टू डेट झाली आहे. कोकण रेल्वेवरील गाडय़ांसंबंधीची किंवा इतरही सेवांसंबंधीची माहिती या अ‍ॅपवर उपलब्ध असेल. सध्या हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून ते अ‍ॅण्ड्रॉइड आणि ब्लॅकबेरी प्रणालीच्या मोबाईल फोनवर डाउनलोड करता येईल.
स्मार्टफोन वापरणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेच्या माहिती तंत्रज्ञान विभागानेच हे अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपवर कोकण रेल्वेच्या सर्व गाडय़ांबद्दलची माहिती असेलच. त्याचप्रमाणे वेळापत्रकातील बदल, काही नव्या घोषणा, कोकण रेल्वेचे विविध उपक्रम यांचीही अद्ययावत माहिती या अ‍ॅपद्वारे घेता येईल. विशेष म्हणजे गाडीची सद्यस्थिती काय आहे, या प्रवाशांच्या नेहमीच्या प्रश्नाचे उत्तरही अ‍ॅपवरून मिळणे शक्य होणार आहे. आजकाल जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. तरुणांना तर संकेतस्थळावर जाऊन माहिती शोधण्यापेक्षा ही माहिती अ‍ॅपद्वारे मिळाली, तर जास्त सुलभ पडते. त्यामुळे कोकण रेल्वेने आपल्या गाडय़ांची आणि सेवांची माहिती अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे विभागीय रेल्वे कार्यालयांनी अशा प्रकारे स्वत:चे अ‍ॅण्ड्रॉइड अ‍ॅप्लिकेशन तयार करणे, ही गोष्ट पहिल्यांदाच घडली आहे. या अ‍ॅपमुळे प्रवाशांच्या सर्व शंकांचे निरसन होईल, असे कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी सांगितले.
हे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी गूगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन कोकण रेल्वे असे टाइप करावे. कोकण रेल्वेचा अधिकृत लोगो असलेले हे अ‍ॅप सहज डाउनलोड करता येईल. तसेच या अ‍ॅपद्वारे तुम्ही कोकण रेल्वेच्या संकेतस्थळालाही भेट देऊ शकता.