नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला अडसर ठरूपाहणाऱ्या दहा गावांपैकी एका गावाने सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणाला सिडकोला परवानगी दिली असून पुढील आठवडय़ात या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांची जमीन संपादनाच्या दृष्टीने पडणारे हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे मानले जात आहे. वास्तविक गणेशोत्सवापूर्वी हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते, पण सणासुदीच्या काळात असे सर्वेक्षण करू नये, अशी विनंती ग्रामस्थांनी केल्याने हे सर्वेक्षण थांबविण्यात आले होते ते आता होणार आहे.
नवी मुंबईतील नियोजित आंतराष्ट्रीय विमानतळाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला दहा गावालगतची जमीन आणि गावांचे स्थलांतर हे महत्त्वाचे प्रश्न अडचण ठरू लागले आहेत. त्यामुळे या ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली असून गावनिहाय प्रश्नांचा निपटारा करण्याचे ठरविले आहे. पंतप्रधान कार्यालयाने देखील या प्रकल्पाविषयी सद्यस्थिती अहवाल मागवला आहे. राज्य सरकार मात्र या प्रकल्पाविषयी म्हणावे इतके गंभीर नसल्याचे दिसून येते. प्रकल्प इतरत्र हलविण्याच्या चर्चादेखील मध्यंतरी सुरू झाली होती. या सर्व पाश्र्वभूमीवर ग्रामस्थांनी गावालगतची जमीन देण्याची तयारी दर्शवली असून गाव स्थलांतराला होकार दिला आहे, पण त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हे स्थलांतर किंवा भूसंपादन शक्य नाही याची कल्पना सिडको प्रशासनाला देण्यात आली आहे. दहा गावे स्थलांतरीत करण्यापूर्वी त्या गावांचा सामाजिक व आíथक सव्‍‌र्हे करणे गरजेचे असल्याचे सिडकोने या ग्रामस्थांना पटवून दिले आहे. या सव्‍‌र्हेअंर्तगत ग्रामस्थांच्या विद्यमान घरांचे बांधकाम, त्याचे क्षेत्रफळ, बांधकामाचा प्रकार, घरातील सदस्यांची संख्या, त्यांचे शिक्षण, वय, नोकरी, धंदा, द्रारिद्रय़रेषेखालील व्यक्ती, अपंगांची संख्या, कुंटुंबाचे एकत्रित उत्पन्न, वाहन, सद्यस्थिती यांची पाहणी करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामुळे सिडकोला ग्रामस्थांच्या जीवनमानात पडणारा फरक भविष्यात स्पष्ट करता येणार आहे. सिडकोच्या या सर्वेक्षणाला चिंचपाडा गावातील ग्रामस्थांनी नुकतीच सहमती दिली आहे. सुमारे एक हजार लोकवस्तीच्या गावाने ही सहमती दिल्याने आजूबाजूची गावेदेखील अशी परवानगी देण्याची शक्यता आहे. हा सव्‍‌र्हे झाला म्हणजे सिडको दुसऱ्या दिवशी स्थलांतरला येईल असा गैरसमज करून घेण्याची गरज नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या सर्वेक्षणामुळे सिडकोचा स्थलांतरासाठी लागणारा गृहपाठ पक्का होण्याची अधिक शक्यता आहे. गणेशोत्सव काळात असा सव्‍‌र्हे सुरू करण्यात आला होता. त्यासाठी घरांवर नंबर टाकण्याचे कामदेखील सुरू करण्यात आले होते, पण सणासुदीच्या काळात ग्रामस्थांमध्ये गैरसमज पसरू नये म्हणून हा सव्‍‌र्हे गावातील पुढाऱ्यांच्या विनंतीवरून पुढे ढकलण्यात आला होता. तो आता पुढील आठवडय़ात पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर उलवा, गणेशपुरी, तलघर, कोंबडभुजे या गावांचा सव्‍‌र्हे होण्याची शक्यता आहे. यातील काही गावांच्या ग्रामसभा लागणार असून त्यात याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, पण चिंचपाडा गावाने यात पुढाकार घेऊन एक नवीन आदर्श घालून दिला आहे.