नवी मुंबई पालिकेचे माजी आयुक्त भास्कर वानखेडे यांच्या ‘हे करू ते करू’ अशा प्रकारच्या वल्गनांना फाटा देऊन विद्यमान आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी सुमारे दोन हजार कोटी रुपये जमेचा शिलकी आणि जवळपास तेवढय़ाच खर्चाचा अर्थसंकल्प शुक्रवारी स्थायी समितीत सादर केला. जो आपल्या मिळकतीपेक्षा अधिक खर्च करतो, तो कधीच सुखी राहत नाही अशा चाणक्यनीतीचा हवाला देत जऱ्हाड यांनी अंथरुण पाहून पाय पसरण्याचा सल्लादेखील प्रशासनाला दिला असून मागील वर्षांच्या नर्सिग कॉलेज, पदव्युत्तर अभ्यासक्रम, झोपडपट्टी पुनर्विकास, नेत्रपेढी, मोरबे अ‍ॅम्युझेन्ट पार्क, ई-लायब्ररी, कर्मचाऱ्यासाठी गृहसंकुल यांसारख्या सवंग लोकप्रियतेच्या घोषणांना फुल्ली मारली आहे. त्याचवेळी एमआयडीसीत सुविधा देणे हे पालिकेचे कर्तव्य असल्याचा साक्षात्कार पालिकेला झाला आहे.
केंद्र सरकारच्या जेएनएनआरयूएम आणि राज्य सरकारच्या एमएमआरडीएकडून मिळणारे संभाव्य अर्थसाहाय्य गृहीत धरून पालिका गेली तीन वर्षे अंदाजपत्रक अडीच हजार कोटी रुपये जमेच्या घरात नेऊन ठेवत होती, पण प्रत्यक्षात मार्चअखेर होणारी जमा ही दीड हजार कोटी रुपये दाखविली जात असल्याने या वर्षीचा अर्थसंकल्प वास्तवदर्शी मांडण्याचा प्रयत्न जऱ्हाड यांनी केला आहे. यात अगोदरच्या आयुक्तांचे नाव न घेता चिमटा काढताना मिळकतीपेक्षा जास्त खर्च करणारा कधीही सुखी होत नाही असा टोला हाणला आहे. या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची दरवाढ करण्यात आलेली नाही. याउलट सरकारने लागू केलेल्या तीन ते चार एलबीटी करात कपात करून तो दोन ते दीड टक्क्य़ांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. यातून प्रिंट मीडियाला लागणाऱ्या कागदावर एलबीटी माफ करण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेला १२ कोटी कमी कर येणार आहे. व्यापारी, उद्योजक यांना दिलासा देताना पालिकेने १५० कोटी एलबीटीवर पाणी सोडले असून आता या करातून ७११ कोटी रुपये जमा होणार आहेत. त्याचप्रमाणे मालमत्ता करात कोणतीही करवाढ न करता ती वसुली अधिक प्रभावीपणे करून ४८० कोटी रुपयांची भर तिजोरीत पडणार आहे. याशिवाय या वर्षी सिडको क्षेत्राला वाढीव एफएसआय मिळणार हे गृहीत धरून त्यातून बांधकाम परवानगीपोटी १३० कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आले आहेत. पाणीविक्री, शासकीय कर्ज, जेएनएनआरयूएमकडील शिल्लक धरून पालिकेने या वर्षी एक हजार ९०८ कोटी रुपये जमा व जवळपास तेवढाच खर्च गृहीत करून ४५ कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला आहे. यात पािलकेने ४२ कोटी रुपये खर्च करून पाण्याचे नियोजन आणि नियंत्रण मोजण्यासाठी बसविण्यात आलेल्या स्काडा या कार्यप्रणालीमुळे पालिकेला जलगती मोजण्यात किती गती आली ते या अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलेले नाही. शहरात पाणीपुरवठा गुरुत्वार्कषण पद्धतीने होत असल्याने विजेची किती बचत झाली त्याचाही उल्लेख या अंदाजपत्रकात नाही. मात्र पाणीपुरवठा या अतिमहत्त्वाच्या कामामागे होणाऱ्या करोडो रुपये खर्चाला आयुक्तांनी या वर्षी कात्री लावल्याचे दिसून येत आहे. २४५ हायमास्टच्या दिव्यांचा उजेड संपूर्ण शहरावर झगमगाट करीत असताना आणखी ७५ हायमास्ट लावून नगरसेवकांना खूश करण्यात येणार आहेत. एमआयडीसीतील उद्योगांना चांगल्या सुविधा न दिल्यास अथवा त्यांच्या करात कपात न केल्यास ते इतरत्र जाऊ शकतात, याचा साक्षात्कार पालिकेला इतक्या वर्षांनी झाला असून आता पालिका तेथील रस्ते, गटारे आणि पदपथ यावर या वर्षी ५४ कोटी रुपये खर्च करणार आहे. ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक पूर्ण होत असून १८ कोटी रुपये दिले जाणार आहेत.
मोरबे येथील अ‍ॅम्युजमेन्ट पार्कची योजना गुंडाळण्यात आली असून घणसोली येथे सावली गावाच्या जमिनीवर असे पार्क तयार केले जाणार आहे, तर नेरुळला वॉटरबॉडी तायर केली जाणार आहे. मुंबईतून येणाऱ्या डेब्रिजचे प्रमाण जास्त असल्याने नवी मुबंईत आता डेब्रिज प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे. केंद्र सरकारच्या मच्छिमार मंडळाच्या माध्यमातून नवी मुंबईत ११ मासळी मार्केट बांधण्यात येणार आहेत. सध्या शहरात २६२ सीसी टीव्ही कॅमेरे आहेत, त्याऐवजी १० कोटी रुपये खर्च करून आणखी ४०० सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. नवीन मुख्यालयात पालिकेचा कारभार पेपरलेस करताना सर्व करांचा भरणा नागरिकांना मोबाईल संगणकावरून करता येण्यासारखा आहे. त्यासाठी सात कोटी रुपये खर्च करून पालिकेने सर्व सेवा तयार केली आहे. पालिकेची इस्टेट वाढविण्याच्या दृष्टीने सिडकोकडून ४२९ भूखंड घेतले जाणार आहेत. पािलकेच्या शाळा हायटेक पद्धतीने बांधण्यात येणार असून या वर्षी त्यासाठी ५५ कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. नवीन बसेस घेण्यासाठी परीवहन उपक्रमाला ३६ कोटी रुपये दिले जाणार आहेत. आपत्कालीन यंत्रणा सक्षम करण्यासाठी तीन कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. नेरुळमध्ये सिलेंडर स्फोटाची घटना ताजी असल्याने संक्रमण शिबिराचा विषय ऐरणीवर आल्याने पाच कोटी रुपये खर्च करून पालिका आता संक्रमण शिबिर बांधणार आहे. त्याशिवाय छप्पर नसलेल्यांसाठी पाच कोटी रुपये खर्च करून निवारा शेड बांधले जाणार आहेत. शहरातील साफसफाईचा सध्या तीनतेरा वाजले आहेत, पण यावरही १०० कोटी खर्च केले जाणार आहेत. सर्व शहरातील नागरिकांना २४ बाय ७ वेळेत पाणीपुरवठा देण्याची जुनी घोषणा पुन्हा अंदाजपत्रकात रेखटण्यात आली आहे. ही काम ७० ते ७५ टक्के झाले आहे असे गेली तीन वर्षे सांगितले जात आहे. एकंदरीत जुन्या नव्याची मिसळ तयार करून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून येत्या दोन महिन्यात करोडो रुपयांची कामे काढली जाणार असून त्यात सर्वाचेच चांगभले कसे केले जाईल हे पाहिले जाणार आहे.  
कोणतीही दरवाढ नाही
वृत्तपत्राला लागणाऱ्या कागदावर एलबीटी माफ
आणखी ७५ हायमास्ट लावून नगरसेवकांना खूश करणार
एमआयडीसीतील रस्ते, गटारे आणि पदपथ यावर
या वर्षी ५४ कोटी रुपये खर्च करणार
नवी मुंबईत ११ मासळी मार्केट बांधणार
आणखी ४०० सीसी टीव्ही कॅमेरे बसविणार