० सत्ताधाऱ्यांनीच व्यक्त केली हतबलता
०वाशी विभाग अधिकाऱ्यांवर आरोपांचे सत्र
०तोडबाज अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
आयुक्तांच्या आदेशानंतरही बिनधोकपणे सुरू असलेली अनधिकृत बांधकामे, फेरीवाल्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शहरांमध्ये बळकावले जाणारे पदपथ आणि डेब्रीज माफियांच्या मुक्त वावरामुळे शहरात साचणारे डेब्रीजचे थर यामुळे नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहराची वाटचाल बकालपणाच्या दिशेने होत असल्याची ओरड महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केल्याने महापालिकेवर अंकुश कोणाचा हा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागला आहे. शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये काम करणारे महापालिकेचे विभाग अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत, अशा तक्रारी स्थायी समिती सभेत करण्यात येत आहेत. वाशी परिसरात विभाग कार्यालयातील जानकी नावाचा अधिकारी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून हप्ते वसुली करत असल्याचा गंभीर आरोपही नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत काही नगरसेवकांनी केला. या आरोपांमुळे वाशीचे विभाग अधिकारी अशोक मढवी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असली तरी महापालिकेतील सध्याच्या कारभारावर या पक्षाचे फारसे नियंत्रण राहिलेले नाही, अशी चर्चा अगदी उघडपणे सुरू असते. वाशीतील फेरीवाल्यांवर नियंत्रण राहावे यासाठी मध्यंतरी ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मध्यंतरी स्वत: रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांचे बळकावलेले पदपथ मोकळे करण्याचे आदेश विभाग अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, गणेशदादांची पाठ फिरताच वाशीतील पदपथांवर पुन्हा फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसविले. पालकमंत्र्यांच्या आदेशांना वाशीतील विभाग अधिकारी कसे वाकुल्या दाखवतात, याचे हे मोठे उदाहरण होते. महापालिका आयुक्त भास्कर वानखेडे यांचाही कारभारावर फारसा वचक असल्याचे दिसून आलेले नाही. मागील अडीच वर्षांत महापालिकेतील प्रशासकीय कामकाजाची घडी पूर्णत: विस्कटली असून कंत्राटी कामांमधील टक्केवारीची वसुली अगदी उघडपणे चर्चेला येऊ लागली आहे. या पाश्र्वभूमीवर नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रशासनावर टीकेची तोफ डागताना मुजोर अधिकाऱ्यांवर अंकुश कोणाचा, असा सवाल उपस्थित केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिरवणे गावातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका माधुरी सुतार यांच्या प्रभागात डेब्रीजचे थर साचले असून वारंवार तक्रारी करूनही ते उचलले जात नसल्याची तक्रार त्यांनी स्थायी समिती सभेत केली. यावर एम. के. मढवी, वैभव गायकवाड, काँग्रेसचे विलास भोईर या सदस्यांनी जोरदार चर्चा घडवून आणत प्रशासनाला धारेवर धरले.

नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांनी जोर धरला असून वारंवार तक्रारी करूनही त्या विरोधात कारवाई होत नसल्याची तक्रार या वेळी सदस्यांनी केली. वाशी विभाग कार्यालयात जानकी नावाचा एक अधिकारी अनधिकृत बांधकामे करणाऱ्याकडून तोडबाजी करत असल्याचा खळबळजनक आरोप विलास भोईर यांनी या वेळी केला. विशेष म्हणजे, वाशीचे विभाग अधिकारी अशोक मढवी यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून हे जानकी महाशय ओळखले जातात. त्यामुळे मढवी यांची कार्यपद्धती पुन्हा एकदा वादात सापडली आहे. दरम्यान, वाशी सेक्टर १७ येथील अनधिकृत गॅरेजविरोधात वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याची खंत खुद्द स्थायी समिती सभापती संपत शेवाळे यांनी या वेळी बोलून दाखवली. विभाग अधिकारी मढवी यांचे या गॅरेजवाल्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही शेवाळे यांनी केली. या वेळी महापालिकेचे उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी थातुरमातुर उत्तरे देउन वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला.