‘टोलनाकाविरोधी रास्ता रोको आंदोलनाची सुरुवात वाशी येथील टोल नाक्यापासून सुरू होणार असून त्याचे नेतृत्व मी स्वत: करणार आहे’ अशी गर्जना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी केल्याने नवी मुंबई पोलिसांची तर रात्रीपासून झोप उडाली. या गर्जनेमुळे नवी मुंबई आणि पर्यायी वाशी टोलनाक्याला अधिक महत्त्व आले होते. बुधवारी सकाळपासून प्रसारमाध्यमांनी वाशी टोलनाक्याजवळ मुक्काम केला होता तर नवी मुंबई पोलिसांची जबाबदारी वाढल्याने अतिरिक्त आयुक्त फत्तेसिंह पाटील यांनी वाशी टोलनाक्यावर ५०० पोलिसांसह तळ ठोकला होता, पण वाशी टोलनाक्यावर येताना ठाकरे यांना चेंबूर येथेच पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पामबीच मार्गावर आंदोलन करणाऱ्या आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी अटकेचे खाते उघडले. संध्याकाळ पर्यंत २०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी तुर्भे एपीएमसी बाजारातील माथाडी भवनाच्या भव्य सभागृहात करण्यात आली होती. हे तुरळक प्रकार वगळता नवी मुंबईतील सर्व कारभार सुरुळीत असल्याने नवी मुंबई कशी शांत. शांत होती.
राज्यातील टोलनाक्याबद्दल ठाकरे यांनी केलेला यल्गार हा नवी मुंबईतूनच केल्याने नवी मुंबईतील कार्यकर्त्यांच्या हाताला काम मिळाले आहे. त्यात मुंबईत प्रवेश करताना लागणारे दोन टोलनाके हे नवी मुंबईत असल्याने टोलनाकाविरोधी आंदोलनाच्या रास्ता रोकोची सुरुवात वाशी टोलनाक्यावरून करण्याची ठाकरे यांनी जाहीर केल्याने नवी मुंबई पोलिसांची मंगळवारपासून झोप उडाली होती. नवी मुंबईतील काही प्रमुख कार्यकर्त्यांना रात्रीच ताब्यात घेण्यात आले होते तर काहीजण भूमिगत झाले होते. तरीही नवी मुंबईत मंगळवारी पोलिसांनी १६० जणांना ताब्यात घेतले. सकाळी मुंबईहून येणाऱ्या कार्यकर्त्यांची एपीएमसी बाजारातील माथाडी सभागृहात रवानगी करण्यात आली. चार हजार ५०० पोलीस संपूर्ण नवी मुंबई, पनवेल, उरण भागात तैनात करण्यात आले होते. त्याच्या जाळ्यात २६० कार्यकर्ते लागले. नवी मुंबईत हे आंदोलन यशस्वीरीत्या रोखण्यात आल्याने मुंबई पुणे किंवा मुंबई गोवा मार्गावर जाणारी वाहतूक सुरुळीत सुरू होती. नवी मुबंईत तर रास्ता रोकोचा प्रभाव जाणवला नाही. पामबीच मार्गावर आठ मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी गाडय़ांची हवा सोडली. त्यामुळे एक दोन तुरळक घटना वगळता नवी मुंबईतील रास्ता रोको शांततेत पार पडला.