लोकसभा निवडणुकीचे पडघम राज्यात वाजू लागल्यानंतर सरकारबरोबरच सर्वच प्राधिकरणांनी खर्चाचा धुमधडाका लावला असून नवी मुंबई पालिकाही त्याला अपवाद नाही. नवी मुंबई पालिकेच्या शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीत सभेत एकाच दिवशी सुमारे ७० कोटी रुपये खर्चाच्या कामांना मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे पालिका दरवर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात अशीच दौलतजादा करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ‘होऊ द्या खर्च, पालिका आहे श्रीमंत’ असे चित्र सध्या आहे.
नवी मुंबई पालिकेचा एक हजार ९०० कोटी जमा व ४५ कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प गेल्या स्थायी समिती सभेत सादर करण्यात आला आहे. वास्तवदर्शी अर्थसंकल्प सादर करणाऱ्या आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेत काँॅक्रीटीकरणाचे अनेक प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवले आहेत. या सर्व प्रस्तावांची कोटीच्या कोटी उड्डाणे असल्याने केवळ दहा प्रस्तावात ६० ते ७० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जेवढे प्रस्ताव मंजूर होतील तेवढे करण्याचे  प्रशासनाने ठरविले आहे. त्यामुळे तीन महिन्यात आटोपणारी कामे कोणत्या गुणवत्तेची होतील याचा विचार नागरिकांनी करण्याची वेळ आली आहे. वाशी येथील हॉटेल सेलिब्रेशनसमोरील रस्ता १२ कोटी ४४ लाख रुपये खर्च करून चकाचक केला जाणार आहे. नेरुळ येथील एमआयडीसी भागात इंडियन ऑईल कंपनी ते बामण लॉरीपर्यंत रस्त्याचे १२ कोटी २३ लाख रुपये खर्च करुन सिमेंट काँॅक्रीटीकरण केले जाणार आहे. ऐरोली येथील नवीन रुग्णालयासमोरील रस्ताचीही पुनर्बाधणी ८२ लाख रुपये खर्च करून केली जाणार आहे. तुर्भे, घणसोली,  कोपरखैरणे या नोडमध्ये करोडो रुपये खर्चाची कामे काढण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे महापे उड्डाणपूल ते कोपरखैरणे येथील टिळक कॉलेजपर्यंत पावसाळी गटारांचे काम हाती घेतले जाणार असून तुर्भे पोलीस ठाण्याची साडेसाती सुटणार आहे. पावसाळ्यात या ठाण्यात पाणी भरण्याच्या घटना नेहमी घडत असल्याने पोलीस हैराण होतात. तेथे पालिका तीन कोटी रुपये खर्च करून गटार बांधणार आहे. त्याचा फायदा या पोलीस ठाण्याला होणार आहे. याचबरोबर गेली कित्येक महिने प्रतीक्षा यादीवर असणाऱ्या ९१ कंत्राटदारांना शुक्रवारी मंजुरी मिळणार आहे. शहरातील दैनंदिनी साफसफाई करण्यासाठी ८१ कंत्राटदाराऐवजी आता ९१ कंत्राटदार होणार असून त्यांच्यावर ३५ कोटी रुपये वार्षिक खर्च होणार आहे. साफसफाई या विषयावर पालिका १०३ कोटी रुपये वर्षांला खर्च करीत आहे. तरीही सध्या साफसफाईबाबत सर्वत्र बोंबाबोंब आहे.