News Flash

केबल संपल्याने डोंबिवलीत नवीन दूरध्वनी जोडण्या रखडल्या

महानगर टेलिफोन निगमच्या डोंबिवली विभागात गेल्या काही महिन्यांपासून केबल वाहिनी उपलब्ध नसल्याने ग्राहकांना नवीन दूरध्वनी जोडण्या देणे बंद करण्यात आले आहे.

| July 26, 2014 02:13 am

महानगर टेलिफोन निगमच्या डोंबिवली विभागात गेल्या काही महिन्यांपासून केबल वाहिनी उपलब्ध नसल्याने ग्राहकांना नवीन दूरध्वनी जोडण्या देणे बंद करण्यात आले आहे. नवीन बांधकामे होणाऱ्या भागात भूमिगत केबल वाहिन्या टाकता येत नसल्याने त्या भागाला दूरध्वनी जोडण्या पुरविणे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. केबल उपलब्ध नसल्याने एमटीएनएलचा विस्तार करणे कठीण होऊन बसले आहे, अशी माहिती या विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तान्तला दिली.
ज्या रहिवाशांनी स्थलांतर केले होते. त्यांना स्थलांतरानंतर नव्याने राहावयाच्या ठिकाणी दूरध्वनी जोडणी देण्यात येत नसल्याचे चित्र पुढे आले आहे. खासगी ठेकेदार केबल वाहिन्या टाकण्याची कामे करतात. केबल उपलब्ध नसल्याने त्यांना काम नाही. एका इमारतीच्या ठिकाणी किमान २० ते २५ ग्राहक आहेत, असे गृहीत धरून केबल वाहिनी टाकली जाते. उच्च दाबाची ही वाहिनी सर्वच दुकानांमध्ये मिळत नाही. मिळाली तरी चांगल्या दर्जाची नसते.
मुंबईत काही ठरावीक ठिकाणी दूरसंचार विभागासाठी लागणारी केबल वाहिनी मिळते. मुंबईला जाऊन केवळ एका ग्राहकासाठी, एका इमारतीसाठी ही केबल खरेदी करणे विभागाला शक्य नसते. अनेक रखडलेली कामे काही अधिकारी स्वत:च्या खिशातून पैसे टाकून दुकानातून केबल आणून करून घेतात. जेणेकरून ग्राहकांच्या तक्रारींचे पाढे कमी होतील, असा त्यामागील उद्देश असतो असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केबल मागवण्यासाठी निविदा प्रक्रिया केली जाते. त्यानंतर एक गठ्ठा केबल भांडार विभागातून विभागवार दूरसंचार विभागाला पाठवली जातो. गेल्या काही महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू आहेत.
झपाटय़ाने उभ्या राहत असलेल्या इमारतींमधील घरांना तात्काळ दूरध्वनीसाठी केबल देणे शक्य नसते. उपलब्ध वाहिन्या जुन्या ग्राहकांना सेवा देताना संपून जातात. त्यामुळे नवीन इमारती, नवीन ग्राहकांना केबल देणे शक्य होत नाही. नवीन इमारतींना दूरध्वनीच्या केबल वाहिन्या देणे गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आले आहे, असे अधिकारी म्हणाला.
विकासकांनी नवीन इमारती बांधताना किमान त्या इमारतीचा रस्ता किंवा मुख्य प्रवेशद्वारापर्यंत वाहिनी टाकली तरी दूरसंचार विभागाचे काम सोपे होईल. पण खर्चीक बाब असल्याने विकासक असे करीत नाहीत. मुख्य कार्यालयाकडून केबल वाहिनीचा साठा येत नाही तोपर्यंत नवीन, जुन्या स्थलांतरित ग्राहकांची कामे करणे शक्य होत नाही, असे दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. दूरध्वनी देयकाच्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांचा महसूल वसूल करणाऱ्या दूरसंचार विभागाला ग्राहक सेवेसाठी साधी केबल वेळेवर खरेदी करता येत नाही, असे संतप्त ग्राहक दूरसंचार कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना सुनावत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2014 2:13 am

Web Title: new phone connections work struck due to cable over
Next Stories
1 कोंडीमुक्त घोडबंदर अद्याप दूरच
2 ठाण्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टुरिस्ट डेपोचा प्रस्ताव
3 आधारवाडी कचरा क्षेपण केंद्राचा प्रश्न गंभीर
Just Now!
X