महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान
ग्रामीण भागातून द्रारिद्रय़ाचे समूळ उच्चाटन होण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान ही नवी योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेतील पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्य़ांमधील ३५ तालुक्यांची निवड झाली असून त्यात ठाणे जिल्ह्य़ाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी पी. वेळारासू तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत मंगळवारी या अभियानाची माहिती दिली.
२००५ च्या सर्वेक्षणानुसार ठाणे जिल्ह्य़ात दारिद्रय़ रेषेखाली २ लाख ३५ हजार कुटुंबे आहेत. दारिद्रय़ाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या या कुटुंबांना त्यातून बाहेर काढण्यासाठी अनुदानाऐवजी प्रशिक्षण आणि प्रोत्साहन अधिक उपयोगी ठरत असल्याचे गेल्या काही वर्षांत राबविण्यात आलेल्या योजनांतून दिसून आले आहे. त्या अनुभवांमुळेच ही नवी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. दरडोई उत्पन्नानुसार ठाणे जिल्हा आता मुंबईपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत जिल्हा असला तरी ग्रामीण भागात कमालीचे दारिद्रय़ आहे. २०११ च्या जनगणनेनुसार १ कोटी दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असली तरी त्यातील ७७ टक्के लोकसंख्या शहरी भागात तर अवघी २३. ८ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनी पारंपरिक शेती उद्योगाला नावीन्याची जोड देऊन शेतकऱ्यांना समृद्धीचा मार्ग दाखविला. या नव्या योजनेतही ग्रामस्थांची उन्नती साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
स्वयंसेवी संस्थांना आवाहन
शासनाने या अभियानात स्वयंसेवी संस्थांना सहभागी करण्याचा निर्णय घेतला असून वार्षिक ५० लाख रुपयांची उलाढाल तसेच ५० हजार व्यक्तींपर्यंत पोहोचू शकणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज मागविले आहेत. दारिद्रय़ाचे चक्रव्यूह भेदण्याची ही मोहीम सात वर्षे सुरू राहणार आहे. ठाणे जिल्ह्य़ात सध्या ११ हजार ३५४ महिला बचत गट असून प्रत्येक कुटुंबातील किमान एक महिला बचत गटाची सभासद करण्याचे उद्दिष्ट या मोहिमेत ठेवण्यात आले आहे. जिल्ह्य़ात सुरुवातीला तलासरी तालुक्यात ही मोहीम राबवली जात आहे. दारिद्रय़ रेषेखालील १८ ते ३५ वयोगटातील तरुणांच्या समूहांना नावीन्यपूर्ण शेती तसेच उद्योगांसाठी सहाय्य केले जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी आपले अर्ज १५ मेपर्यंत े१’्रऋ@े२१’े.१ॠ या मेलवर पाठवावेत. संपर्क- ०२२/२७५६२५५२.