विधानसभा परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने दाखल केलेल्या अविश्वास ठरावाला सत्ताधारी भाजप सरकारने सोमवारी दिलेल्या समर्थनाचे सर्वात पहिले पडसाद नवी मुंबई पालिका निवडणुकीत उमटणार आहेत. भाजपच्या या खेळीच्या विरोधात शिवसेनेने रातोरात काँग्रेसबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते. त्यानुसार दोन्ही पक्षांनी एकमेकांना मदत करून राष्ट्रवादीच्या विरोधात जास्तीत जास्त नगरसवेक निवडून आणण्याची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. राज्यात कितीही भाजप राष्ट्रवादी समझोता झाला असला तरी नवी मुंबईत भाजपचे स्थानिक नेते मात्र राष्ट्रवादीबरोबर घरोबा करण्यास तयार नाहीत. त्यामुळे नवी मुंबईत काही प्रभागांत काँग्रेस, शिवसेना, भाजप अशी महायुती होऊन नाईक विरुद्ध सर्व पक्ष अशी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील राजकारणाने वेगळी कलाटणी घेतली आहे. काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेत खेळलेल्या राजकीय खेळीचे पडसाद नवी मुंबई व औरंगाबाद या दोन पालिका निवडणुकीवर सर्वप्रथम उमटणार आहेत. त्याची सुरुवात नवी मुंबईत झाली असून सोमवारी दुपारी देशमुख यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर काँग्रेसने नवी मुंबईत राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याचा मनोदय रद्द केला. यापूर्वी नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पालिका निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसने एकत्र येण्याचे सूतोवाच केले होते. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे येथील सर्वेसर्वा गणेश नाईक यांच्याशी संपर्कदेखील साधला होता. आघाडीच्या दिशेने हालचाली सुरू झालेल्या असताना देशमुख प्रकरणाने हा दुरावा अधिक वाढला असून नवी मुंबईत राष्ट्रवादीला धडा शिकविण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.
बुधवारपासून या पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू होणार असून ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार प्रबळ आहेत त्या ठिकाणी शिवसेनेने मदत करण्याचे आश्वासन घेण्यात आले आहे तर शिवसेनेच्या उमेदवारांना काँग्रेसने सहकार्य करण्याचे ठरले आहे. वाशी येथील प्रभाग क्रमांक ६० मध्ये काँग्रेसचे अविनाश लाड उमेदवार आहेत. त्यांना मदत करण्याचे संदेश रातोरात शिवसैनिकांना फिरल्याचे समजते. त्या ठिकाणी शिवसेनेचे बेलापूर विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे यांना उमेदवारी देण्याचा पक्षाने निर्णय घेतला होता, पण राज्यातील बदललेल्या परिस्थितीनुसार एकमेकांना मदत करण्याचे ठरले आहे. त्यामुळे मोरे माघार घेण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेत भाजपने राष्ट्रवादीला कितीही साथ दिली असली तरी या ठिकाणी नाईक यांना पूर्ण धोबीपछाड देण्यासाठी भाजप शिवसेनेला साथ देणार आहे. या संदर्भात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्याबरोबर उपनेते विजय नाहटा यांची नुकतीच एक बैठक म्हात्रे यांच्या घरी पार पडली आहे. त्यामुळे राज्यात भाजपने राष्ट्रवादीच्या गळ्यात गळा घातला तरी बेलापूरच्या भाजप आमदार नाईक यांच्याशी समझोता करण्यास तयार नाहीत. त्यामुळे नवी मुंबईत काही ठिकाणी शिवसेना, भाजप, काँग्रेस छुपी महायुती होणार असून येथील राजकारण पूर्ण ढवळून निघाले आहे. नाईक यांची पालिकेतील एकहाती सत्ता उलथवून लावण्यासाठी ही महायुती होत असून एका बाजूला सर्व विरोधी पक्ष आणि एका बाजूला राष्ट्रवादीचे नाईक असे चित्र येत्या काळात दिसून येणार आहे.

शिवसेनेला काँग्रेसबरोबर हातमिळवणी करण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेसच्या कमीत कमी २०-२५ आजी-माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद मूळात पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे. पालिकेत शिवसेनेला निर्विवाद स्पष्ट बहुमत लाभणार आहे. त्यामुळे छुपी वगैरे युती हा शिवसेनेचा पिंड नाही. मला पक्षाने प्रभाग क्रमांक ६० मध्ये निवडणूक लढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मी कामाला लागलो आहे. राज्यात युती असल्याने भाजपबरोबर या ठिकाणी युती व्हावी यासाठी आमच्या पक्षाचे नेते प्रयत्नशील आहेत. त्यात जागा वाटपाचा सर्वस्वी निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.
विठ्ठल मोरे, शिवसेना संपर्क प्रमुख, बेलापूर