* प्रवाशांना दिलासा
* कर्मचाऱ्यांची अदलाबदल
* रेल्वे स्थानक मार्गावर अधिक सेवा
अतिशय खंगलेल्या अवस्थेत रडतखडतपणे सुरू असलेल्या आणि त्यामुळे नेहमीच टीकेचे धनी ठरलेल्या ठाणे परिवहन उपक्रमाने उशिरा का होईना ठाणेकर प्रवाशांना नव्या मार्गाची भेट देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी आनंदनगर भागात नवे बस आगार उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आनंदनगर भागातून घोडबंदर भागातील वेगवेगळ्या सात मार्गावर बससेवा सुरू करण्यात येणार असून त्यासाठी २०० वाहक तसेच चालकांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच आनंदनगर, शास्त्रीनगर तसेच पातलीपाडा भागातून ठाणे स्थानकाच्या पूर्व तसेच पश्चिमेकडे दोन्ही मार्गावर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव परिवहन प्रशासनाने बुधवारी होणाऱ्या परिवहन समितीच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी आणला आहे. ठाणे परिवहन सेवेची आनंदनगर भागात जागा असून या जागेवर तिसरे बस आगार उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात परिवहन सेवेचे व्यवस्थापक देविदास टेकाळे, सदस्य काशिनाथ राऊत आणि अजय जोशी यांची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. आनंदनगर येथील आगार उभारण्यासंबंधी सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आनंदनगर येथील आगार सुरू झाल्यानंतर येथून घोडबंदर भागातील वेगवेगळ्या मार्गावर बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये घोडबंदर भागातील कासारवडवली, ब्रह्मांड / धर्माचा पाडा, मुलुंड केळकर कॉलेज ते ब्रह्मांड / धर्माचा पाडा, वाघबीळ, पातलीपाडा, कोकणीपाडा-टिकुजिनीवाडी, ओवळा आदी मार्गाचा समावेश आहे. या मार्गावर सुमारे २८ बसेस सुरू करण्यात येणार असून या बसेसच्या दिवसाला ७९१ फेऱ्या होणार आहेत. या बसेस चालविण्यासाठी सुमारे शंभर चालक तसेच शंभर वाहक, अशा दोनशे वाहक-चालकांची आवश्यकता आहे. तसेच सहा वाहतूक नियंत्रक, एक वाहतूक निरीक्षक, दोन सहाय्यक वाहतूक निरीक्षक, एक कनिष्ठ लिपिक त्याचबरोबर तिकीट व रोखा, डीओआर, समय विभाग, सफाई कामगार अशा एकूण १३ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी वागळे आणि कळवा आगारातील कर्मचाऱ्यांची या आगारामध्ये बदली करण्यात येणार असून त्यांची यादी प्रशासनाने तयार केली आहे.
नवे मार्ग, पण अनेक अडचणी..
आनंदनगर ते ठाणे स्टेशन (पूर्व) चेकनाका मार्ग बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव ठाणे परिवहन प्रशासनाने तयार केला आहे. मात्र, वागळे आगारात १७७ बसगाडय़ांचे दिवसाचे वेळापत्रक तयार असून प्रत्यक्षात १४५ ते १५० बसगाडय़ा रस्त्यावर धावतात. पुरेशा बसेस नसल्याने सुमारे २७ फे ऱ्या दिवसाला रद्द होतात, असा आजवरचा अनुभव आहे. अशा स्थितीत आनंदनगर ते ठाणे स्टेशन (पूर्व) ही बस सेवा सुरू करण्यासाठी अन्य मार्गावरील बसगाडय़ांमधून एक बस कमी करावी लागणार आहे. नगरसेवकांच्या मागणीवरून शास्त्रीनगर ते ठाणे पूर्व या मार्गावरील बसगाडय़ा पूर्वीप्रमाणे ठाणे पश्चिम येथून चालविण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र, या मार्गावर बससेवा सुरू केल्यानंतर कोणत्या अडचणी येऊ शकतात, याची सविस्तर माहिती प्रशासनाने प्रस्तावात दिली आहे. ठाणे पूर्व ते शास्त्रीनगर या मार्गावर महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तसेच ठाणे पूर्वऐवजी पश्चिम येथून बस सेवा सुरू केल्यास पूर्व येथील मार्गिकेवर बेस्ट उपक्रमाकडून अतिक्रमण होण्याची भीती आहे. पातलीपाडा-ठाणे बस ऋतू टॉवर, स्वस्तिक पार्क नाका, ब्रह्मांड मार्गे वळविण्याचाही प्रशासनाचा विचार आहे.