आरोग्य केंद्राच्या तपासणीसाठी १३ तालुक्यात १३ भरारी पथके तयार करण्यात आली असून येत्या पंधरवडय़ापासून जिल्ह्य़ातील आरोग्य केंद्राची तपासणी केली जाणार आहे. आरोग्य समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी दिली.
आरोग्य केंद्रात रुग्णांना औषधी मिळत नाही, डॉक्टर उपस्थित राहत नसल्यामुळे उपचार मिळत नाही, अशा अनेक तक्रारी असताना रुग्णांच्या तक्रारीचे निरसन व्हावे या उद्देशाने ही तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक भरारी पथकात एक आरोग्य विभागाचा खातेप्रमुख व दोन डीएलएस याची नियुक्ती करण्यात आली आहे. रात्री ८ ते सकाळी ८ अशा १२ तासांमध्ये हे पथक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अ‍ॅलोपॅथिक, आयुर्वेदिक रुग्णालयात अचानक भेट देऊन तपासणी करणार आहे.   
२० जानेवारीपासून पल्स पोलिओ मोहीम सुरू होणार असून, जिल्ह्य़ातील १ लाख ८० लाभार्थीना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सोमनाळामध्ये नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम मंजूर झाले आहे .मेडिकलमधील बंद असलेला टी बी वॉर्ड सुरू करण्यासंदर्भात मंत्र्यांना विनंती करण्यात येणार असून येत्या १५ दिवसात वॉर्ड सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
डिसेंबर २०१२ या महिन्यात जिल्ह्य़ातील एकूण २ हजार १७१ पाणी नमुन्याची तपासणी करण्यात आली आहे. त्यात ८१ पाण्याचे नमुने दूषित आढळून आले.
त्यात नागपूर ४ (१३८), कुही (१६५) ७, सावनेर (१८५) ८, भिवापूर (११५) ८, कळमेश्वर (१३९) ८, पारशिवणी (२३४) १८, उमरेड (१४१) ५, कामठी (१५२) १, रामटेक (१५६) ४, नरखेड (१७२) ५, हिंगणा (१७४) ४, काटोल (१५३) ५ आणि देवलापार (९६) ४ पाणी नमुन्याचा समावेश
आहे.