मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
कर्करोग रुग्णांची तपासणी आणि उपचारासाठी आधुनिक यंत्रणा परळ येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात बसविण्यात आल्या असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते अलीकडेच तिचे उद्घाटन करण्यात आले. या नव्या यंत्रणांमुळे रुग्णांची तपासणी अधिक सुलभ पद्धतीने आणि सविस्तर करणे शक्य होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या तीन यंत्रणांपैकी एक आहे ‘डिजिटल मॅमोग्राफी विथ थ्रीडी थोमोसिन्थेसिस’. यामुळे स्तनांचा कर्करोग झालेल्या रुग्णाची तपासणी बारकाईने करणे शक्य होणार आहे. स्तनाच्या आतील कर्करोगाची अत्यंत छोटी गाठही या यंत्रामुळे उघड होऊन त्यावर तात्काळ उपचार सुरू करणे शक्य होणार आहे. कर्करोग असलेल्या भागाची सर्व बाजूने तपासणी करून तो किती प्रमाणात पसरला आहे याचीही पाहणी या यंत्रामुळे शक्य होणार आहे. ‘मॉलिक्युलर डायग्नोसिस अॅण्ड ट्रान्सलेशनल मेडिसिन’ यंत्रामुळे कर्करोग रुग्णाची अत्यल्प काळात पासणी करून अधिक अचूक निदान करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कर्करोग असलेल्या भागावर उपचार पद्धती अधिक केंद्रीत करणे शक्य होणार आहे. तर ‘हायब्रिड डिजिटल सबट्रॅक्शन अँजियोग्राफी विथ सीटी स्कॅन फॅसिलिटी’ ही भारतात सर्वात प्रथमच आणण्यात आली आहे. यामुळे सर्व प्रकारच्या टय़ूमरचे निदान करणे शक्य होणार आहे. रुग्णाला त्याच्या खोलीतून अन्यत्र न हलविता त्याची तपासणी करणे डॉक्टरांना शक्य होणार आहे. या यंत्रणेमुळे कर्मचाऱ्यांची क्षमता वाढू शकते, अधिक अचूक उपचार पद्धतीवर भर देता येईल आणि रुग्णांना आरामदायी आणि सुव्यवस्थित उपचार घेता येतील, असे टाटामधील डॉक्टरांचे म्हणणे आहे.