‘राजकारण आणि नेते’ यांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचा भाग होत संबंधितांना धडा शिकविण्याची गरज आहे’, या विचाराने प्रेरित होत बुधवारी विधानसभा निवडणुकीत नवमतदारांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवत मतदान केले. कोणाला उमेदवार महत्वाचा वाटतो तर कोणाला पक्षाची भूमिका तर काहींनी अजूनही सक्षम पर्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. या संदर्भात निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या नवमतदारांशी संवाद साधला. त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया, त्यांच्याच शब्दात.
nsk03विचारांती निर्णय
प्रथमच मतदान करत असले तरी आजुबाजुला काय घडत आहे याची मला पूर्णत: जाणीव आहे. महिलांची सुरक्षितता, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेती या साऱ्या प्रश्नांमुळे खुंटलेला राज्याचा विकास. ही परिस्थिती बदलण्याच्यादृष्टीने मतदानाच्या माध्यमातून पहिल्यांदा प्रयत्न करत आहे.
केंद्रात सत्ता असल्याने राज्यात पण सरकार आले तर राज्याचा विकास सहज शक्य होईल. या विचाराने ‘अब की बार.’ म्हणत आपण मतदान केले आहे.
कोमल चौधरी (अभियांत्रिकी)

माझं मत विकासाला
निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या पध्दतीने प्रचार प्रसार केला. मात्र या प्रचाराचा दबाव वाटण्यापेक्षा डोळ्यांसमोर एक चित्र स्पष्ट झाले की, आपणास कोणाला आणि का मत द्यायचे आहे. पहिल्यांदाच मी या प्रक्रियेत सहभागी होत असल्याने माझे मत ‘विकासाला’ आहे. कारण, मला माझ्या मतदार संघाचा कायापालट झालेला पहायचा आहे. स्थानिक प्रश्नांची ज्याला जाण आहे, जो वाचाळ असण्यापेक्षा क्रियाशील आहे तसेच जनतेशी जो सातत्याने संपर्क ठेऊन आहे, पक्षा पेक्षा मी व्यक्तीला पाहुन मतदान केले.
मनिष महाजन (बारावी)

‘व्होट फॉर बेटर महाराष्ट्र’
प्रथमच मतदान करताना आनंद होत आहे. आजवर आईवडिलांच्या किंवा मोठय़ांच्या बोटावर शाई पाहिली होती. त्या शाईचा मी हकदार झालो ही भावना खुप सुखद आहे. मतदान करतांना जो राज्याचा सर्वागीण विकास घडवून आणेल, अशा व्यक्तीची आपण निवड केली. या शिवाय मतदान केल्यानंतर मित्र परिवार तसेच कॉलनीतील लोकांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. ‘व्होट फॉर बेटर महाराष्ट्र’च्या दृष्टीने माझे मतदान आहे.
हितेश अहिरे (बी. कॉम)

व्यक्तीला प्राधान्य
प्रथमच निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत आहे याचा आनंद वाटतो. घटनेने दिलेला अधिकार बजावतांना थोडासा गोंधळ झाला. पण मतदान करतांना आपण जो राज्याचा विकास करू शकेल, त्यांची तेवढी बौध्दिक क्षमता आहे, अशा व्यक्तीला निवडून मतदान केले. युवा वर्ग त्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, रोजगार उपलब्ध करून देईल असा पक्षाच्या व्यक्तीला आपण मत दिले आहे. माझ्या ग्रुपमध्येही आपण सकाळीच मित्र मैत्रीणींना लघुसंदेश तसेच ‘व्हॉट्स अ‍ॅप’ वरून मतदान करा असे आवाहन केले. कारण राज्याचा विकास होण्यासाठी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणावर मतदानास बाहेर पडणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्या मतांचा कोणी गैरवापर करू शकतो असे आम्हाला वाटते.
– भाग्यश्री व राजश्री वटारे (बीएससी, अभियांत्रिकी)

डंका पिटणाऱ्यांना का मत द्यायचे ?
मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचा आनंद आहे. आपण प्रथमच मतदान प्रक्रियेत सहभागी होत आहे. रोज दूरचित्रवाणी, समाज माध्यमे, तसेच जाहीर प्रचाराच्या माध्यमातून वेगवेगळे पर्याय समोर येत होते. प्रत्येक पक्षाचा जाहिरनामा वाचला, त्याची वास्तवाशी तुलना केली तर फोलपणा अधिक जाणवला. विकासाचा खोटा डंका पिटणाऱ्यांपेक्षा पडद्याआड राहून काम करणाऱ्यास आपण मत दिले आहे. उगाच लोकांची दिशाभुल करत, प्रसिध्दीचा हव्यास बाळगणाऱ्यांना मत का द्यायचे ? आपण लहान आहोत, पण मुर्ख नाही. म्हणूनच योग्य व्यक्तीला आपले मत दिल्याचे समाधान आहे.
– गौरव उशीर