पाण्याची समस्या लक्षात घेता शहरात नवीन जलधारेण आवश्यक आहे. यादृष्टीने महापालिकेने याकडे लक्ष वेधले असल्याची माहिती महापौर अनिल सोले यांनी दिली. नीरीमध्ये ‘घरगुती पाणी प्रक्रिया, सुरक्षित साठवण आणि जलसुरक्षा’ या विषयावर तीन दिवसाच्या कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते.
या कार्यशाळेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे, जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफचे मान्यवर उपस्थित होते. आशिया आणि आफ्र्रिका खंडातील देशात जलसुरक्षा योजना आणि घरगुती पाणी प्रक्रिया याविषयी या कार्यशाळेत चर्चा करण्यात येणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागपुरात २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची तयारी महापालिकेने केली असल्याची माहिती महापौरांनी दिली.
 जागतिक आरोग्य संघटनेच्या पेडेन म्हणाल्या, आशिया खंडात पाण्याच्या गुणवत्तेशी जुळलेले असे अनेक मुद्दे आहेत की त्यांचे निवारण विज्ञानाच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे. त्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेला नीरीकडून पाणी आणि स्वच्छतेबाबत बरेच सहकार्य मिळते. भविष्यातील पाणीसाठा सुरक्षित करण्यासाठी पाण्याचे स्रोत आणि वापर या दोन्हीविषयी विचार झाला पाहिजे, असे नीरीचे डॉ. सतीश वटे म्हणाले. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. पवनकुमार लाभसेटवार यांनी केले तर संचालन रामया सनम यांनी केले.