सोलापूर शहरात नववर्षाची सुरुवात विविध प्रश्नांवर मोर्चा, धरणे, निदर्शने, कामबंद आदी विविध आंदोलनांनी झाली. त्यामुळे नववर्षांच्या पहिल्याच दिवशी पोलीस यंत्रणेवर ताण पडला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, छत्रपती शिवाजी शासकीय सवरेपचार रुग्णालय, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच महापालिका परिवहन विभाग इत्यादी भागांत आंदोलने झाली.
गेल्या २४ डिसेंबर रोजी सोलापुरातून मध्य प्रदेशच्या दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने दोन संशयित तरुणांना अटक करून त्यांच्याकडून तीन शक्तिशाली बॉम्बसह अन्य स्फोटके तसेच संगणकांसह छपाई साहित्य जप्त करून नेले होते. ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आक्षेप घेत नववर्षांला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमियत-ए-उलेमा सोलापूर शाखेच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात शेकडो उलेमांसह एक हजारापेक्षा अधिक मुस्लिम नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. निर्दोष व निष्पाप तरुणांना लक्ष्य करून खोटय़ा दहशतवादी कारवायांप्रकरणी अटक केली जात असून त्यांना मुक्त करावे, जातीय दंगलविरोधी विधेयक तातडीने मंजूर करावे आदी मागण्यांसाठी आयोजित या धरणे आंदोलनात काँग्रेसचे माजी महापौर अ‍ॅड. यू. एन. बेरिया, आरीफ शेख, नगरसेवक रियाज हुंडेकरी यांच्यासह जमियत-ए-उलेमाचे शहराध्यक्ष मौलाना मोहम्मद इब्राहिम व सचिव हाजी मैनोद्दीन शेख तसेच ऑल इंडिया इमाम कौन्सिलचे प्रदेश सरचिटणीस मौलाना हारिस, सनाऊल्ला शेख, जमात-ए-इस्लामी सोलापूर शाखेचे अध्यक्ष अनवर जानवाडकर, अ‍ॅड. महिबूब कोथिंबिरे आदींचा प्रामुख्याने सहभाग होता. याशिवाय मौलाना जबिउल्लाह, मौलाना अबुल कलाम, मौलाना तय्यबसाहेब, मुजावर जमातीचे अध्यक्ष नजीर मुजावर, पालिका शिक्षण मंडळाचे सदस्य राजा बागवान, आय. आय. अलीम यांनीही आंदोलनात भाग घेतला होता.
या वेळी  माजी महापौर अ‍ॅड. बेरिया यांनी पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक निष्पाप तरुणांना जाणीवपूर्वक त्रास देत असेल तर त्याविरोधात होणाऱ्या लढय़ात आपला सक्रिय सहभाग असेल, आपणास राजकीय परिणामाची चिंता नसल्याचे स्पष्ट केले. या वेळी विविध मौलाना व उलेमांसह अ‍ॅड. मतीन पटेल, अ‍ॅड. महिबूब कोथिंबिरे, इसाक मणियार, अ. जब्बार बसरी आदींची भाषणे झाली. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना निवेदन सादर करण्यात आले.
मनसेचा जिल्हा बँकेवर मोर्चा
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतक-यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ चालविली असून, बँकेच्या संचालकांनी स्वत:चे साखर कारखाने, शिक्षण संस्थांना भरमसाट कर्ज घेऊन ते परतफेड न केल्याने बँक आर्थिक अडचणीत आली आहे. तेव्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा बँकेवर मोर्चा काढण्यात आला. बँकेच्या संचालकांचे मुखवटे चेहऱ्यावर चढवून मनसेचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे, जिल्हाप्रमुख भूषण महिंद्रकर, शहरप्रमुख युवराज चुंबळकर यांच्यासह दिनेश हंचाटे, जैनोद्दीन शेख, सलीम मुल्ला आदींचा या मोर्चात सहभाग होता. बँकेसमोर मोर्चा पोहोचल्यानंतर तेथे बँकेच्या कारभाराविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.
डॉक्टरांचा मोर्चा
छत्रपती शिवाजीमहाराज शासकीय सवरेपचार रुग्णालयात रुग्णावर उपचार करण्यावरून एका निवासी डॉक्टरला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर यांनी बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांच्या (मार्ड) संघटनेने दुपारी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर मोर्चा काढला. वैद्यकीय शिक्षक संघटनेचे डॉ. ए. एन. म्हस्के यांच्यासह मार्डचे अध्यक्ष डॉ. राहुल राऊत, सचिव डॉ. जितेंद्र रामटेके, उपाध्यक्ष डॉ. शिवप्रसाद लाखपात्रे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.  
पोलीस निरीक्षक वायकर यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई व्हावी व त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मार्डने दुसऱ्या दिवशीही कामबंद आंदोलन केले. या आंदोलनाची व्याप्ती राज्यभर वाढविण्यात येणार असून, राज्यातील शासकीय रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टर संपात उतरणार असल्याचे डॉ. जितेंद्र रामटेके यांनी सांगितले. मोर्चेक-यांनी वैद्यकीय महाविद्यालयावर मोर्चा नेल्यानंतर अधिष्ठाता डॉ. अशोक शिंदे यांना निवेदन सादर करण्यात आले.
डॉक्टरांच्या विरोधात निदर्शने
दरम्यान, शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टरांकडून रुग्णांवर वैद्यकीय उपचार योग्य प्रकारे करीत नाहीत, म्हणून पोलीस निरीक्षकांकडून निवासी डॉक्टराला चोप मिळाल्याचा आरोप करीत संबंधित दोषी डॉक्टरविरुद्ध कारवाई व्हावी या मागणीसाठी सकाळी वैद्यकीय महाविद्यालयासमोर सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुमन जाधव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. तसेच मनसेच्या वतीनेही डॉक्टरांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. याशिवाय शहर पिंजारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांना भेटून संबंधित दोषी डॉक्टरविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली.
महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याविषयी पालिका परिवहन समितीच्या सभेत अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पालिका परिवहन समिती सदस्यांच्या विरोधात परिवहन कर्मचा-यांनी काळय़ा फिती लावून काम केले. नंतर बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या आवाहनानुसार हे आंदोलन मागे घेण्यात आले.