कर्मचारी, अधिकारी, आयुक्त, महापौर, नगरसेवक, रहिवासी, विकासक, दलाल.. पालिकेच्या मुख्यालयात या सगळ्यांची नेहमीच लगबग सुरू असते. कोणतीतरी सभा, बैठका, निर्णय, झालेच तर आंदोलन, निषेध अशा कारणांसाठी असंख्य लोक पालिकेच्या इमारतीत येत राहतात. मात्र गेले काही दिवस पालिकेच्या मुख्यालयाची रया ओसरली आहे. मजल्यावरच्या एखाद अधिकाऱ्याचा अपवाद वगळता सर्व केबिन रिकाम्या आहेत. याचे कारण आहे ते नवीन वर्ष व या वर्षांच्या उरलेल्या रजा संपवण्याचे ध्येय..
सर्व शहरात असलेला गुलाबी थंडी व सुटय़ांच्या मोसमाचे प्रतिबिंब पालिकेच्या मुख्यालयावरही पडले आहे. आयुक्त सुट्टीवरून परतले असले तरी अतिरिक्त आयुक्तांच्या केबिन आलटूनपालटून रिकाम्या असल्याने आणि कर्मचाऱ्यांनीही वर्षअखेरीस सुट्टी संपवण्यासाठी घरीच राहणे पसंत केल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. दोन निवडणुकांमध्ये गुंतलेले कर्मचारी तसेच डिसेंबरच्या अखेपर्यंत चाललेले अधिवेशन यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना वर्षांच्या सुट्टय़ा संपवण्यासाठी अवधीच मिळाला नाही. या वर्षांतील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे अध्र्याहून अधिक कर्मचारी चार महिने निवडणूक कामांमध्ये गुंतले होते. त्यामुळे एप्रिल-मेच्या उन्हाळी सुट्टय़ांचा लाभही कर्मचाऱ्यांना घेता आला नव्हता. त्यामुळे वर्षअखेरीच्या मोसमाचा लाभ उठवत कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनीही सुट्टीवर जाणे पसंत केले आहे.
नगरसेवकांनीही नवीन वर्षांच्या स्वागतासाठी मुंबईबाहेर जाणे पसंत केल्याने बुधवारी होणारी स्थायी समितीची बैठकही पुढे ढकलून शुक्रवारी ठेवण्यात आली आहे. पालिकेच्या मुख्य सभागृहाची बैठकही आता नव्या वर्षांतच होईल. त्याचप्रमाणे सुधार, शिक्षण या समित्यांसह सर्वच बैठका २० डिसेंबरपूर्वी आटोपत्या घेऊन लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ांचा मार्ग मोकळा केला आहे. कर्मचारी, अधिकारी व लोकप्रतिनिधीही नसल्याने त्यांच्याकडे कामासाठी येत असलेल्या कार्यकर्त्यांची, दलाल व विकासकांचीही पावले मुख्यालयाकडे वळलेली नाहीत. शुक्रवारी होत असलेली स्थायी समिती व सभागृहाची बैठक यामुळे पालिकेत नवीन वर्षांचे कामकाज सुरू होणार असले तरी प्रत्यक्षात सोमवारनंतरच पालिका सभागृहातील मरगळ झटकली जाईल.