सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांचे जल्लोषात स्वागत करता यावे यासाठी ठाण्यातील हॉटेल, बार व्यावसायिकांनी वेगवेगळ्या करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ठाणे पोलिसांनी हॉटेलांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांना रात्री दीडपर्यंतच परवानगी देऊ केल्याने व्यावसायिक पेचात सापडले आहेत. विशेष म्हणजे, एखाद्या हॉटेलमधून पार्टी साजरी करून िझगत बाहेर पडला आणि पोलिसांनी गाठलेच तर तळीरामासह हॉटेल मालकांवरही गुन्हे दाखल होणार आहेत. त्यामुळे नववर्षांच्या स्वागताच्या तयारीत असलेली तरुणाई यंदा इमारतीच्या गच्चीवर थर्टीफस्ट साजरा करण्याचे बेत आखू लागली आहे.
ठाणे पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करत हॉटेल, बार व्यावासायिकांना यंदा न्यू इयर पाटर्य़ासाठी रात्री दीड वाजेपर्यंतची मुभा दिली आहे. नववर्षांच्या पाटर्य़ा झोडून मद्याच्या नशेत वाहन चालविणाऱ्या चालकांकडून अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा चालकांविरोधात कारवाई करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सुमारे ३२ विशेष पथके तयार केले आहे. विशेष म्हणजे मद्यपी चालकांवर कारवाईसाठी शहरातील मुख्य नाके आणि चौकात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी १६ श्वास विश्लेषक यंत्राच्या सहाय्याने मद्यपी चालकांची तपासणी करण्यात येणार आहे. हे करत असताना शहरातील प्रमुख हॉटेलांबाहेर यावेळी खास बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एखादा िझगत बाहेर आलाच आणि वाहन चालविण्याच्या फंद्यात पडलाच तर त्याला हॉटेल बाहेरच गाठायचे, अशी योजना तयार आहे. हे करत असताना हॉटेल चालकावरही गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मद्यपी चालकांना मद्य पुरविणाऱ्या हॉटेल व्यावासयिकांना सह आरोपी करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून त्यासंबंधीच्या नोटीसा हॉटेल तसेच बार व्यावासायिकांना धाडण्यात आल्या आहेत. ठाणे पोलिसांच्या या निर्णयामुळे पाटर्य़ामध्ये खंड पडू नये, यासाठी ठाणेकरांनी नववर्षांच्या स्वागतासाठी सुरक्षित जागा शोधण्यास सुरुवात केली आहे. ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील फार्म हॉऊस, येऊरमधील बंगले हे नववर्ष स्वागतासाठी सुरक्षित ठिकाणे मानली जात असली तरी शहरात पार्टी करायची असेल तर इमारतीची गच्ची बरी, असा मतप्रवाह दिसू लागला आहे. वसाहतीमधील नागरी संघटनेची परवानगी घेऊन इमारतीच्या गच्चीवर मंडप सजू लागले असून तेथेच डिजे संगीत आयोजन केले जात आहेत.