ठाणे जिल्ह्य़ातील बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली आणि ठाणे अशा विविध शहरांमध्ये आयोजित नववर्ष स्वागतयात्रांमध्ये दुष्काळग्रस्तांसाठीच्या निधी संकलनास हातभार लावून नागरिकांनी गुढीपाडव्याचा सण मोठय़ा उत्साहात साजरा केला. राज्यतील दुष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन स्वागतयात्रांच्या माध्यमातून निधी संकलन करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला होता. आयोजकांच्या या निर्णयास नागरिकांनीही चांगला प्रतिसाद देऊन हातभार लावला. सर्व शहरांमधील स्वागतयात्रांमध्ये तरुण अग्रस्थानी होते.
या सर्व शहरांमध्ये सकाळपासूनच मोठय़ा उत्साहात स्वागतयात्रांना सुरुवात झाली होती. दरवर्षीप्रमाणे पारंपरिक वेशभूषेमध्ये नागरिक यात्रेत सहभागी झाले होते. ठाण्यातील स्वागतयात्रेत ३०हून अधिक चित्ररथ सहभागी झाले होते. यातील काही चित्ररथांनी महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला. तसेच काही चित्ररथांमधून स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला. यातील एका संस्थेने तयार केलेल्या स्वामी विवेकानंदांच्या चित्ररथाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट या गतिमंद मुलांच्या संस्थेनेही यावेळी शिक्षणाचे महत्त्व आणि स्त्रीसुरक्षेविषयी संदेश दिला, तसेच शुभलहरी प्रतिष्ठाननेही शिक्षणाचे महत्त्व सांगितले. ‘चिल्ड्रन थिएटर्स’ संस्थेच्या वतीने मुलांनी टी.व्ही, व्हिडीओ गेम यामध्ये वेळ घालविण्यापेक्षा बालनाटय़ाकडे वळण्याचा संदेश दिला. यावेळी संस्थेचे विद्यार्थी आतापर्यंत सहभाग घेतलेल्या विविध नाटकांमधील पात्रांची वेशभूषा परिधान करून यात्रेत सहभागी झाले होते. यंदाही व्हिन्टेज कारनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
डोंबिवली येथील यात्रेमध्येही  सामाजिक संस्थांनी दुष्काळाचे भान पटवून देण्याचा प्रयत्न केला. अनेक संस्थांनी घरातील पाण्याचा काळजीपूर्वक वापर करण्याचे आवाहन केले. येथील भागशाळा मैदानापासून यात्रेला प्रारंभ करण्यात आला. विविध सामाजिक संस्था आपल्या कार्याची ओळख पटविणारी माहिती देत होत्या. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंतची मंडळी सहभागी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. दीनदयाळ चौकात तोफेतून पुष्पवृष्टी करून एक वेगळा आनंद देण्यात येत होता. स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या चित्ररथावर दुष्काळाची भीषण चित्रे लावण्यात आली होती. पाणी वाचविण्याचा संदेश यावेळी शाळकरी मुलांनी दिला. स्वागतयात्रेतील श्वानांचा सहभाग वैशिष्टय़पूर्ण होता. पक्ष्यांसाठी घराबाहेर पाण्याची भांडी ठेवण्याचा संदेश देणारा चित्ररथ लक्षवेधी होता. गणेश मंदिर संस्थानतर्फे यावेळी ७८ चित्ररथांवरील पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. अलिबागजवळील नागावच्या मल्लखांबपटूंनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. कल्याणमध्ये सिंडीकडे येथून यात्रेला प्रारंभ झाला. ३९ चित्ररथ यात्रेत सहभागी झाले होते. शहरातील नागरिक आनंदाने यात्रेत सहभागी झाले होते, तसेच अंबरनाथ आणि बदलापूरमध्येदेखील भव्य अशा स्वरूपात यात्रा निघाल्या होत्या.