News Flash

सातबारा – नवी मुंबई महापालिका निवडणूक : दिग्गजांचे भवितव्य ठरविणारे प्रभाग

काँग्रेसमधील कंपूशाहीला कंटाळून शिवसेनेते डेरेदाखल झालेले सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत, पवार निष्ठावंत असलेले व्यापारी व उपमहापौर अशोक गावडे,

| April 18, 2015 01:01 am

काँग्रेसमधील कंपूशाहीला कंटाळून शिवसेनेते डेरेदाखल झालेले सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत, पवार निष्ठावंत असलेले व्यापारी व उपमहापौर अशोक गावडे, तीन वेळा विजयाची हॅट्ट्रिक साधणारे संतोष शेट्टी, अभ्यासू व उद्योजक नेत्रा शिर्के, गतवर्षी ज्यांच्या उमेदवारीवरून नवी मुंबईतील ताई-माईमध्ये टोकाचे वितुष्ट निर्माण झाले ते डॉ. जयाजी नाथ, पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अत्यंत सक्षमरीत्या विरोधी पक्षनेतापद सांभाळणाऱ्या सरोज पाटील निवडणूक रिंगणात असून त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या यंगिस्तानचे नेतृत्व करणारे नगरसेवक संदीप सुतार, डी. वाय. पाटील महविद्यालयात चिकाटी, परिश्रम आणि एकनिष्ठेच्या बळावर रजिस्ट्रारपदापर्यंत मजल मारणारे उच्चशिक्षित डी.टी. कोलते, गरीब, गरजू आणि आदिवासी भागातून पुढे आलेल्या राजश्री कातकरी, आमदार संदीप नाईक यांचे निकटवर्तीय  जयंत हुद्दार, पालिका मुख्यालयासमोर फडकविण्यात आलेल्या सर्वात उंच झेंडय़ाबद्दल आदर आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारे अब्दुल्ला ऊर्फ समीर बागवान, शेकापचे नवी मुंबईतील एकमेव नेते व नगरसेवक भरत जाधव, माजी महापौर चंदू राणे यांच्या कानशिलात भडकवल्यामुळे प्रकाशझोतात आलेले विनोद म्हात्रे आणि परिवहन समितीचे सभापती गणेश म्हात्रे या सर्वाचे शेवटच्या वीस प्रभागांत भविष्य ठरणार आहे.
या वीस प्रभागांपैकी भगत, गावडे, जाधव, डॉ. नाथ, शेट्टी, इथापे यांच्या लढतींकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. त्यात शेट्टी यांनी तर चार सत्रे पालिकेत गाजवली असून काँग्रेसमधील चाणक्य अशीच त्याची ख्याती आहे. त्यामुळे पहिल्या महापौरपदापासून ते चर्चेत आलेले आहेत. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे या दोन आगरी नेत्यांमध्ये बिनसण्याचे कारण पाच वर्षांपूर्वीच्या डॉ. नाथ यांची उमेदवारी हे आहे.
नाथ यांच्या जागी म्हात्रे आपल्या मुलाला नीलेश म्हात्रे यांना उमेदवारी मागत होत्या पण नाईक यांनी ती नंतर पवार याच्या सूचनेनुसार दिली नाही. काळ बदलला आणि ताई आमदार झाल्यामुळे त्यांच्या मुलाने भाजपमधील बहुतांशी उमेदवारी निश्चित केल्याचे मानले जाते.
त्या डॉ. नाथ यांच्यासमोर भाजप अध्यक्ष सी. व्ही. रेड्डी यांना उमेदवारी देऊन ताईंनी ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. नेत्रा शिर्के व अनिता शेट्टी या दोन नगरसेविकांची लढत देखील लक्षवेधी ठरणार आहे. ऐनवेळी भाजपमधून परत आलेल्या धनाजी ठाकूर यांच्या बरोबर भगत यांची लढत आहे.
त्यांची पत्नी इंदुमती भगत यांची लढत गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे गिरीष म्हात्रे यांच्या बरोबर आहे. म्हात्रे यांना उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेने दर्शवली होती असे नंतर जाहीर करण्यात आले होते.
या वीसपैकी आठ प्रभागांत भाजपचे भवितव्य ठरणार असून आमदार म्हात्रे यांना या प्रभागांत भाजपला चांगले यश मिळेल, असा अधिक विश्वास आहे.

विकास आणि अपेक्षा
करावे गावमध्ये रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. नियोजन नसल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाडय़ा त्या ठिकाणी पोहचू शकत नाही. पदपथाची अवस्था दयनीय झाली आहे. या ठिकाणी कचऱ्याकुंडय़ा भरून ओसांडून वाहत असून दरुगधी येते. कचरा व भटक्या कुत्र्यांची समस्या कायम आहे.  विकासच्या दृष्टीने सीबीडी सेक्टर १५मध्ये पालिका मुख्यालयाची आलिशान इमारत बांधण्यात आली आहे. सुशोभित असे वंडर्स पार्कदेखील या ठिकाणी आहे. नेरुळ येथे रॉक गार्डनचा विकास करण्यात आला आहे. पण या उद्यानामध्ये ठेवण्यात आलेली प्रवेश फी ही घेण्यात येऊ नये, अशी नागरिकांची मागणी आहे. नेरुळ येथील स्मशनभूमीमधील विद्युत शवदाहिनी बंद आहे, ती सुरू करण्यात यावी, बेलापूर किल्ल्याचे संवर्धन करण्यात यावे, अर्बन हाटमध्ये पालिकेच्या माध्यामातून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात यावेत ही अपेक्षा आहे. सीबीडी डेपोमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी तसेच बेलापूरमधील सुनील गावस्कर मैदान स्वच्छ करण्यात येऊन क्रीडाप्रेमींसाठी ते खुले करण्यात यावे, अशी क्रीडाप्रेमींची इच्छा आहे. बेलापूरमध्ये सुसज्ज अशी अभ्यासिका व ग्रंथालय आहे. बेलापूर येथील कोकण भवन परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यात यावे, दिवाळे गावातील मासळी मार्केटची कामे करण्यात यावीत. बेलापूरमध्ये बाल रुग्णालय सुरू करण्यात यावे, महापालिकेच्या मुख्यालयात जाण्यासाठी नेरुळमधून वेळेत बस मिळत नाही म्हणून बसेस वेळेत सोडण्यात याव्यात. नेरुळच्या पश्चिमेच्या बाजूला सुनियोजित असे उद्यान नसून या ठिकाणी उद्याने बांधावीत. नेरुळ पूर्वेला माता-बाल रुग्णालयाचे काम रखडले आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. बेलापूर व नेरुळमध्ये रस्त्यांची अवस्था सुस्थितीत आहे. पण पदपथवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. या प्रभागांमध्ये सार्वजनिक  शौचालयाची कमतरता असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय होत असल्याने सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवण्यात यावी, उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बांधण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

प्रभाग क्रमांक ९१ ते १११ मधील लढती
प्र. क्र. ९१
नेरुळ  से.१३, १७ व
१९, २१ भाग
मतदार ८२७४
राष्ट्रवादी – नेत्रा शिर्के
काँग्रेस- अनिता शेट्टी
प्र.क्र. ९२
नेरुळ से.२१, दरावे गाव,
से.२३,१९ भाग
मतदार ९८६५
राष्ट्रवादी – संदीप सुतार
भाजप- सुनील पाटील
प्र. क्र. ९३
नेरुळ से.२० व १०चा भाग
मतदार ४८६४
शिवसेना -नामदेव भगत
अपक्ष -धनाजी ठाकूर
प्र. क्र. ९४
नेरुळ से. १०चा भाग
मतदार ७८५९
राष्ट्रवादी – वैजयंती भोर
शिवसेना – उज्ज्वला घोडेकर
प्र. क्र. ९५
नेरुळ से. १२, १०, २०
नेरुळ गाव
मतदार ४४०३
राष्ट्रवादी गिरीश म्हात्रे
शिवसेना इंदुमती भगत
प्र.क्र. ९६
नेरुळ से. १८ भाग, से. १६, १६ए
मतदार ८५२१
राष्ट्रवादी -रुपाली भगत
शिवसेना – निर्मला माने
काँग्रेस – कविता बारवे
प्र.क्र. ९७
नेरुळ से. १८ भाग, १८ ए,
२४ व से.२० भाग
मतदार ९३९०
राष्ट्रवादी -धाकोजी कोलते
शिवसेना – काशिनाथ पवार
काँग्रेस – गुलाब लोंढे
प्र. क्र. ९८
नेरुळ से. २६, २८, २२, ४०, ४२, ३०, ३२
मतदार ६०१०
राष्ट्रवादी – स्वप्ना गावडे
भाजप – मंगला ढेंबर
काँग्रेस -श्रद्धा गायकवाड
प्र. क्र. ९९
नेरुळ से.२३ भाग, २५, २७
मतदार ५४५०
राष्ट्रवादी – सलुजा सुतार
भाजप – नेहा होनराव
काँग्रेस – साफिया हवादार
प्र.क्र. १००
नेरुळ से. १९ भाग, १९ ए
मतदार ९५०१
राष्ट्रवादी – रवींद्र इथापे
काँग्रेस – संतोष शेट्टी
प्र.क्र. १०१
बेलापूर से. १०, २१, २२, २३, २४, २५, २६, २८, २९, ३० व ३१
मतदार ७४६५
राष्ट्रवादी -राजश्री कातकरी
शिवसेना – सरोज पाटील
प्र. क्र. १०२
बेलापूर से. ९, ९एन, १,
१ए भाग, से.२ व ३
मतदार ९७४७
राष्ट्रवादी – अशोक गुरखे
भाजप – महेश जाधव
काँग्रेस – धनाजी खराडे
प्र. क्र. १०३
बेलापूर से. ८, ८ए, ८ बी, रमाबाई आंबेडकर नगर,
मतदार ७५३१
राष्ट्रवादी – सुरेखा नरबागे
भाजप – सुवर्णलता रंगारी
काँग्रेस – प्रियांका ढोबळे
प्र. क्र. १०४
बेलापूर से. ३ ए, ४, ५, ६ व ८ बी
मतदार ९३४८
राष्ट्रवादी – जयाजी नाथ
भाजप – सी. व्ही. रेड्डी
प्र. क्र. १०५ दिवाळे गाव से. ११, १२, १३ व से.१९
मतदार ७४२२
राष्ट्रवादी – चंद्रकांत पाटील
शिवसेना -भारती मंगळया
प्र. क्र. १०६
बेलापूर गाव, शहाबाज गाव, फणसपाडा, से १९, २०
मतदार ८१३०
राष्ट्रवादी – ज्योती पाटील
भाजप – शैलेजा पाटील
काँग्रेस – पूनम पाटील
प्र. क्र. १०७
बेलापूर से. १५, १५ए, ३२, किल्ले गावठाण, नेरुळ से. ५२, ५०
मतदार ५५६०
राष्ट्रवादी – जयंत हुदार
भाजप – दीपक पवार
काँग्रेस – सुधीर पाटील
प्र. क्र. १०८
नेरुळ से. ४८ व से.५०
मतदार ८५६३
राष्ट्रवादी- विशाल डोळस
शिवसेना – विशाल विचारे
शेकाप – कविता जाधव  
प्र. क्र. १०९
नेरुळ से. ३८, ४२ ए, ४८ ए,
से.४४ भाग
मतदार ६९८१
राष्ट्रवादी -अशोक गावडे
शिवसेना -अब्दुल्ला बागवान
शेकाप -भरत जाधव
प्र. क्र. ११०
करावे गाव से. ३६ से. ३२,
३३ करावे गाव
मतदार ७२९४
राष्ट्रवादी -विनोद म्हात्रे
भाजप -पुण्यनाथ तांडेल
प्र. क्र. १११
से. ५८ए, नेरुळ से. ४६, ४६ ए, से. ३६ से. ४४
मतदार ६६४६
राष्ट्रवादी -गणेश म्हात्रे
भाजप -दत्तात्रय घंगाळे

माझी भूमिका
नवी मुंबईचा र्सवकष सर्वागीण विकास करणार
नवी मुंबई वरकरणी चांगली सुंदर वाटत असली तरी तिच्यात अनेक समस्या आजही आ वासून उभ्या आहेत. पार्किंग, अस्वच्छता, फेरीवाले, वाहतूक कोंडी या समस्या शहराला भेडसावू लागल्या आहेत. त्यामुळे तिचा सर्वागीण र्सवकष आणि समतोल विकास करण्याची आवश्यकता आहे. राज्यातील हे एकमेव नियोजनबद्ध शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी लवकरच काही उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि वाशी खाडी पुलाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. वाशी पुलावर आता दोन पूलही अपुरे पडू लागले आहेत. सिडकोच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या मेट्रोचा नवी मुंबई पालिका क्षेत्राला फायदा व्हावा यासाठी येथील दिघा ते बेलापूर हा मेट्रो मार्ग प्रस्तावित असून त्याचे काम सुरू केले जाणार आहे. वाढीव एफएसआय, कल्स्टर यामुळे शहराची लोकसंख्या अधिक वाढणार आहे. त्यांना लागणाऱ्या सुविधांचा आत्तापासून विचार केला जाणार आहे. पालिकेच्या आरोग्य सुविधांसाठी कर्मचारीवर्गाचा तुटवडा पडत आहे. हे योग्य नाही. त्यामुळे सर्वप्रथम ही सर्व रुग्णालये सुरू व्हावीत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. काही पर्यटनस्थळे आहेत पण ती म्हणावी अशी विकसित करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे १२ पर्यटनस्थळांचा विकास हे सेनेचे ध्येय आहे. त्यात गवळी देव पर्यटनस्थळ लवकरच पर्यटकांसाठी खुले होणार आहे. निर्सग उद्यान, पालिकेचा स्पोर्ट्स क्लब, तरणतलाव यांसारख्या सुविधा या शहराला मिळणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक, तरुण, खेळाडू, महिला, या सर्वाचा विचार सेना करणार असून झोपडय़ांसाठी पुनर्बाधणी योजना आणल्या जाणार आहेत. हे शहर जगात सुंदर, रेखीव आणि आकर्षक व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून केंद्र व राज्यात असलेले आमचे सरकार त्यासाठी उपयोगी येणार आहे. त्यामुळे सीआरझेडमध्ये अडकलेले अनेक प्रकल्प लवकरच मार्गी लावले जाणार आहेत. या वेळी सत्ता परिवर्तन करण्याचे जनतेने ठरविले आहे. येथील घराणेशाहीला नवी मुंबईकर आता कंटाळले आहेत.
– एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा ठाणे जिल्हा प्रमुख, शिवसेना

नवी मुंबईतील सर्व जमीन फ्री होल्ड करा
शहराला पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी पालिकेची आहे. ती पालिका पूर्ण करत असते. त्यासाठी फार परिश्रम करावे लागत नाहीत, पण शासनाकडे काही प्रलंबित विषय आहेत ते सोडविण्याचे खरे आव्हान माझ्यासमोर आहेत. त्यात सर्वप्रथम शहरातील सिडकोची जमीन फ्री होल्ड करण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. फ्री होल्ड केल्याशिवाय नागरिकांना हे आपले घर असल्याचा आनंद मिळणार नाही. सिडकोने ही जमीन लीजवर दिलेली आहे. त्याची मालकी सिडकोकडे आहे. ती रहिवाशांकडे आली पाहिजे त्यासाठी येत्या काळात मी प्रयत्न करणार आहे. त्यानंतर केवळ सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींना वाढीव एफएसआय देऊन चालणार नाही. त्यासाठी ही योजना खासगी इमारतींसाठी देखील अमलात आणावी लागणार आहे. हे शहर आता कात टाकणार आहे. त्यामुळे त्यात दुजाभाव होता कामा नये. झोपडपट्टीच्या पुनर्बाधणीचे केवळ इतकी वर्षे गाजर दाखविले गेले, पण झोपडपट्टय़ांचा विकास करण्याची कोणाचीही इच्छा नाही. तेथील रहिवाशांचा विकास व्हावा, त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. झोपडय़ांची पुनर्बाधणी आणि त्या ठिकाणी चांगल्या इमारती हे माझे तिसरे ध्येय आहे. राहिला विषय माझ्यावर दाखल करण्यात आलेल्या अब्रूनुकसानीचा, तर त्याची न्यायालयीन लढाई लढली जाईल. मी काय बोलले ते व्हिडीओ रेकॉर्डिग आहे. त्यामुळे मला त्याची चिंता वाटत नाही. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारायचे नसतात. मी मागे पडले तर त्यांना सळो की पळो होईल हे कदाचित माहीत नाही. त्यांच्याकडे प्रचाराचे आता मुद्दे राहिले नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणूकीतील मढी उकरून काढली जात आहेत.
– मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर तथा भाजप नेत्या, नवी मुंबई

विकासाचे मुद्दे घेऊनच ही निवडणूक लढविणार
आघाडी सरकारने राज्यात खूप चांगली कामे केलेली आहेत. त्यांचा प्रसार लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही आम्हाला करता आला नाही. नवी मुंबईसाठी तर मैलाचे ठरतील असे निर्णय आघाडी सरकारने घेतलेले आहेत. त्यात प्रकल्पग्रस्तांची घरे कायम करण्याचा पहिला निर्णय  सर्वप्रथम मी मुख्यमंत्री असताना जानेवारी २०१० रोजी घेण्यात आला आहे. त्यात सुधारणा करून युती शासनाने तो आत्ता घेतला आहे, पण त्याचा पाया आघाडी सरकारने आणि येथील काँग्रेस नगरसेवकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ते शक्य झाले आहे. त्यानंतर नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाची नीव काँग्रेस सरकारने घातली असून त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यासाठी मी व विलासराव देशमुख यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केलेले आहेत. वाढीव एफएसआयचा निर्णय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता. तो विधानसभा आचारसंहितेत अडकला. युती शासनाने अडकलेला तो निर्णय योग्य असल्याने जनरेटय़ामुळे मंजूर केला. त्यामुळे आघाडी सरकारने नवी मुंबईकरांना काही तरी दिले आहे. आता त्यांनी पक्षाला सहकार्य करण्याची गरज आहे,  एवढेच इथे सांगता येईल. त्यामुळे दुसऱ्यांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यापेक्षा आघाडी सरकारने घेतलेले सकारात्मक निर्णय घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. स्थानिक समस्यांबाबत म्हणाल तर संपूर्ण शहरातील पार्किंग व्यवस्था सुरळीत करणे, सीसीटीव्ही लावणे, मोरबेचे पाणी अद्याप घराघरात पोहचवणे (ते पोहचलेले नाही), सिडकोकडे असलेले सर्व भूखंड पालिकेला हस्तांतरित करणे बंधनकारक करणे, रखडलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिभवन लवकर कार्यान्वित करणे, रुग्णालये सुरू करणे असे स्थानिक प्रकल्प मार्गी लावले जाणार आहेत. केंद्र सरकारने लागू केलेला भूमी संपादन अधिनियम जाचक असून त्याविरोधात काँग्रेस देशव्यापी आंदोलन उभारणे असून भूमी अधिनियमाचा मोठा फटका रायगड जिल्ह्य़ाला बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्तापासून जागरूक राहण्याची आवश्यकता आहे.
– अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

शिवसेनेच्या नेत्यांना मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही
मुंबई, ठाणे या दोन जिल्ह्य़ांतील पालिकांचा कारभार बघा, पिण्याचे पाणी, डम्पिंग ग्राऊंड, सांडपाण्याचा निचरा यांसारखे प्रश्न येथील सत्ताधाऱ्यांनी सोडविलेले नाहीत. या ठिकाणी शिवसेना सत्तेवर आहे. त्यामुळे त्यांना नवी मुंबईत मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही. नवी मुंबईत २४ तास पाण्याची हमी देण्यात आली आहे. मुंबईच्या डम्पिंग ग्राऊंडवरील दरुगधीमुळे नवी मुंबईकरांचा जीव नकोसा झाला आहे, पण ते शहर अद्याप डम्पिंग ग्राऊंडची व्यवस्था करू शकलेले नाही. नवी मुंबईत शास्त्रोक्त पद्धतीने ८५ हेक्टर जमिनीवर डम्पिंग ग्राऊंड उभारण्यात आले आहे. घराघरात तयार होणाऱ्या सांडपाण्यावर सी टेक पद्धतीने प्रक्रिया केली जात आहे. उद्यानांना वापरण्यासारखेही पाणी आहे. ही तीन प्रमुख सुविधा नवी मुंबईत असून आजूबाजूच्या पालिकेत ती ४० वर्षांत झालेली नाहीत. ती आम्ही वीस वर्षांत दिलेली आहेत. याशिवाय मुंबईपेक्षा दुप्पट उद्याने, मुख्यालये, तेथील सर्वात उंच ध्वज, वण्डर पार्क, रॉक गार्डन, ठाणे बेलापूर रस्ता, शाळा व्हिजनद्वारे बांधलेल्या अद्ययावत शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाढलेली टक्केवारी, अशी विकासाची शेकडो कामे या पालिकेने आमच्या नेतृत्वाखाली केलेली आहेत. त्यामुळे विकासासाठी सत्ता द्या ही युतीची धूळफेक असून सत्ता असलेल्या पालिकेत काय केले ते अगोदर सांगा, असा सवाल आहे. युती शासनाने मंजूर केलेली वाढीव एफएसआय व क्लस्टर योजना फसवी असल्याने ती आम्हाला मंजूर नाही. त्यामुळे सिडको हटावची आम्ही मागणी करीत आहोत. कोणताही पुरावा नसताना आरोप करणाऱ्यांवर खटले भरले जाणार आहेत. गुणवत्ता, क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी देणे म्हणजे घराणेशाही नाही. अशा एकाच घरातील दहा उमेदवारांना तिकीट देण्याची माझी तयारी आहे.
– गणेश नाईक, माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते.

मतदानासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत
नवी मुंबई  : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे निर्देशानुसार मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्यात येणार आहे.
२२ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळत मतदान होणार आहे. पालिका क्षेत्रातील विविध आस्थापना, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाटय़गृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापना यांनी आपल्या कामगारांना मतदानाच्या दिवशी हक्क बजावण्यासाठी भर पगारी सुट्टी द्यावी अशी सूचना केली आहे. ज्या उद्योगातील कामगारांच्या गैरहजेरीत  मोठय़ा प्रमाणावर नुकसान होईल अशा मतदारांना दोन तासांची सवलत देण्यात यावी. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी राज्य घटनेने बहाल केलेला मतदानाचा हक्क बजावावा व शहराच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तुभ्रेत मतांसाठी पैसे वाटप करताना पकडले
नवी मुंबई  : तुभ्रे गावातील भाजपचे उमेदवार रामचंद्र घरत यांच्यासाठी पसे वाटप करणाऱ्या एका कार्यकर्त्यांला रंगेहाथ पकडून देण्यात आले. या प्रकरणी तुभ्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तुभ्रे गावातील जितेंद्र म्हात्रे यांना ५०० रुपये देण्याचे आमिष दाखविले.  ११  मतांसाठी प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे साडेपाच हजार रुपये देण्याची तयारी दर्शविण्यात आली होती. या विरोधात जितेंद्र म्हात्रे यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.  या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने गुरुवारी रात्री उशिरा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत पाटील, अरविंद म्हात्रे व इतर दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरुद्ध भाजपच्या रोहित भोसले यांनी तक्रारी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 1:01 am

Web Title: news from navi mumbai municipal corporation election
Next Stories
1 गुप्तचर विभागाचा अंदाज..  राष्ट्रवादी-४५, सेना-३८ भाजप-१६
2 निकृष्ट अंतर्गत रस्ते आणि दुर्गंधीचे नाले
3 सातबारा: नवी मुंबई महापालिका निवडणूक
Just Now!
X