श्रमिक मुक्ती दलाचे १७ वे वार्षिक अधिवेशन बोरीव-रहिमतपूर (ता. कोरेगाव)  येथे होणार आहे. अधिवेशनात राज्यभरातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सलग तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकां त राज्यात तिसरा पर्याय उभा करणे, सरकारच्या पाणी धोरणाला विरोध करणे आदी विषयांवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. दिलीप पाटील, प्रशांत पन्हाळकर उपस्थित होते.
भारत पाटणकर यांना जनलोकपाल विधेयकाविषयी विचारले असता त्यांनी आत्ताच्या जनलोकपालचा स्थानिक पातळीवर लोकांना काहीही फायदा होणार नसल्याचे मत व्यक्त केले. श्रमिक मुक्ती दलाची स्थापना १९८० मध्ये झाली. संघटनेचे यंदाचे ३२ वे वर्ष आहे. त्यानिमित्त १७ वे वार्षिक अधिवेशन होत आहे. ते डिसेंबरअखेर होणार असून, त्यात राज्यभरातील नंदुरबार, औरंगाबाद, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, लातूर, नागपूर आदी जिल्ह्यातून पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तीन दिवसांतील अधिवेशानात विविध महत्त्वपूर्ण विषयावंर चर्चा होईल. रहिमतपूर बस स्थानकापासून ३० बैलजोडीच्या मिरवणुकीने आव्हानाचा बिगुल वाजवला जाईल. २६ डिसेंबर रोजी खुल्या व्यासपीठाने अधिवेशनाचा समारोप होणार आहे. अधिवेशनात श्रमिक मुक्ती दलाच्या युवक चळवळीची घोषणा होणार आहे. त्याचबरोबर पाणी प्रश्नांसाठी ४ फेब्रुवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाचा ठराव घेण्यात येणार आहे. यावेळी आगामी निवडणुकीतील तिसऱ्या पर्यायांचा ठराव होईल असे पाटणकर म्हणाले.