नवी मुंबई पालिकेच्या पुढील महिन्यात होणाऱ्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता पुढील आठवडय़ात लागण्याची शक्यता असून पाालिका प्रशासनाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. या आठवडय़ात होळी आणि धुलीवंदन असल्याने हे सण झाल्यानंतर पुढील आठवडय़ात १३ मार्च रोजी ही आचारसंहिता लागणार असून पालिकेने महासभा आणि स्थायी समिती सभांचा धुमधडाका लावला आहे.
नवी मुंबई पालिकेचे चौथे सभागृह पुढील महिन्यात संपुष्टात येणार आहे. या सभागृहात एकूण ८९ सदस्य होते. त्याची फेररचना करून राज्य निवडणूक आयोगाने या वेळी १११ सदस्यसंख्या केली आहे. एकसदस्यीय निवडणूक पद्धतीने होणाऱ्या या निवडणुकीचे ७ फेब्रुवारी रोजी प्रभाग आरक्षण व रचना जाहीर झाली असून २६ फेब्रुवारी रोजी २०५ हरकतींवर सुनावणी घेण्यात आली आहे. त्यानंतर आता आचारसंहिता लागू होणार असून पुढील महिन्यात १० एप्रिल दरम्यान प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. त्यासाठी एकूण दोन हजार मतदान केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. त्यांची ठिकाणे निश्चित करण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे.
आजूबाजूच्या पालिकांमधून निवडणूक कर्मचारी मागविण्यात आले आहेत. आचारसंहिता केव्हाही लागण्याच्या धास्तीने सत्ताधारी राष्ट्रवादीने नागरी कामांच्या मंजुरीसाठी महासभा आणि स्थायी समिती सभांचा धुमधडाका लावला आहे. त्यामुळे अनेक नगरेसवकांच्या प्रभागांत करोडो रुपये खर्चाची नागरी कामे काढली जात असून यात नगरसेवकांचे उखळ पांढरे होत आहे. अनेक कामांबद्दल नागरिकांच्यात तक्रारी असून बोगस कामांचा सुळसुळाट झाला आहे. संपूर्ण शहरात कामे सुरू असून यात चांगले रस्ते, पदपथ, गटारे उखडून त्या जागी नवीन बनविण्याचे काम सुरू आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी ही कामे करण्याची घाई सुरू असून पुढील आठवडय़ात १३ फेब्रुवारी रोजी ही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर सुरू असलेला सभांचा धडाका बंद होणार आहे.