मुंबईच्या ‘नाइट लाइफ’विषयी शिवसेनेचे युवराज कितीही आग्रही असले तरी मुंबईतील सर्वसामान्य जनता मात्र रहिवासी संघ आणि संघटनांच्या माध्यमातून या विचाराला कडाडून विरोध करीत आहे. नाइट लाइफच्या नावावर जे काही करायचे आहे ते व्यापारी क्षेत्रात करा, निवासी ठिकाणी नको, अशी बहुतांश रहिवाशांची मागणी आहे. तसेच यामुळे गुन्हेगारी वाढेल, तरुण बिघडतील, पोलिसांचा त्रास वाढेल, अशा अनेक कारणांमुळे नाइट लाइफला विरोध होतो आहे.
वांद्रय़ातील रात्रभर चालणाऱ्या पब आणि बारच्या विरोधात तिथल्या रहिवासी मॅन्युअल सॅल्डाना यांनी इतर रहिवाशांच्या मदतीने जोरदार लढा दिला होता. रात्री दारू पिऊन बेहोष होणाऱ्यांमुळे या भागातील रहिवाशांना काय काय सहन करावे लागत होते? दारूचा अंमल इतका असायचा की कपडे काढून रस्त्यावर वावरणे, दारूच्या बाटल्यांमध्ये मलमूत्र भरून त्या बाटल्या तिथेच टाकून देणे किंवा बाटल्या फोडून त्याच्या काचा इतरत्र टाकून देणे, गाडय़ांमध्ये मोठमोठय़ाने गाणी लावून रस्त्यावर शांतता भंग करणे, अशा अनेक प्रकारांना तोंड देऊन इथले रहिवासी कंटाळले होते. आता तर मोटरसायकलचा कानठळ्या बसविणारा आवाज करीत मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावरील शांतता चिरत जाण्याचा प्रकार चालतो. यामुळे केवळ वांद्रय़ातीलच नव्हे तर मुंबईतील अनेक भागांतील रहिवासी विशेषत: वृद्ध, लहान मुले त्रस्त असतात. त्यामुळे नाइट लाइफ हवे, पण व्यापारी क्षेत्रात असे काही रहिवासी संघटनांचे म्हणणे आहे. तर नाइट लाइफमुळे गुन्हेगारी वाढेल, असे म्हणत त्याला काही संघटनांचा टोकाचा विरोध आहे.
‘मुळात परदेशात नाइट लाइफला असलेले पूरक असे वातावरण मुंबईत नाही. इथे तुम्ही निवासी क्षेत्रातच चालणाऱ्या पब आणि डिस्कोंना रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची परवानगी देणार, पण यामुळे आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या नाइट लाइफच्या नावाखाली जे काही करायचे आहे ते व्यापारी क्षेत्रात (कमर्शियल) करा, अशी सूचना  ‘एच (डब्ल्यू) वॉर्ड सिटिझन्स ट्रस्ट’च्या सचिव विद्या वैद्य यांनी केली.
‘रिव्हाइव्हल सिटिझन्स रेसिडेन्स ग्रुप’च्या अध्यक्ष मॅन्युअल सॅल्डाना यांनीदेखील वैद्य यांच्या भूमिकेशी सहमती दर्शविली. त्या म्हणतात, ‘मुंबईचे पोलीस राकेश मारिया यांनी शहरात मनोरंजनाकरिता स्वतंत्र क्षेत्रे असावीत, अशी सूचना केली होती. आम्ही त्याचे स्वागतच करतो. गेली अनेक वर्षे आम्ही याकरिता लढत होतो. कारण आपल्याकडील पब किंवा बार यांना योग्य प्रकारे लायसेन्स दिले जात नाही. ५० ची क्षमता असलेल्या पबमध्ये दीडशे-दोनशे लोक कोंबलेले असतात. त्याचा परिणाम बाहेरची व्यवस्था विस्कळीत होण्यावर होतो. पार्किंगची सोय नसल्याने अनेकदा त्यांच्या गाडय़ा आमच्या निवासी इमारतींचे प्रवेशद्वार अडवून उभ्या असतात. अनेकदा त्यांच्या महागडय़ा गाडय़ांमुळे चोरांचा सुळसुळटही वाढतो. पब रात्री दीडच्या सुमारास बंद होत असले तरी मध्यरात्री अडीच-तीनपर्यंत आजूबाजूच्या परिसरात गोंगाट सुरूच असतो. याशिवाय त्यांच्या उभ्या असलेल्या बाऊन्सर्सचाही आजूबाजूच्या लोकांना खूप त्रास होतो. ते रस्ता वेढून असतात. अनेकदा आजूबाजूच्या रहिवाशांशी ते अत्यंत उद्धटपणे बोलतात. आम्ही पब किंवा नाइट लाइफच्या विरोधात नाही; परंतु रहिवाशांची रात्रीची झोप उडविण्याचा अधिकार कुणालाही नाही.’
गांधीनगर, खेरनगर, मजास व्हिलेज, आदर्शनगर, टागोरनगर, कन्नमवारनगर, पंतनगर आदी म्हाडा कॉलनींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘म्हाडा कॉलनी विकास संघ’च्या अध्यक्ष संध्या तेंडुलकर यांनी नाइट लाइफमुळे समाजातील अनीतीपूर्ण बाबींना उजळ माथ्याने वावरण्यास प्रोत्साहन मिळेल, असे स्पष्ट करीत विरोध दर्शविला. ‘सतत शिवाजी महाराजांचे नाव घेत संस्कृती संरक्षणाच्या गप्पा करणाऱ्या संघटनेचा युवा नेता मात्र नाइट लाइफची मागणी करतो यासारखा दैवदुर्विलास नाही. याच्यामुळे गुन्हेगारी वाढेल. पोलिसांवरील कामाचा भार वाढेल. वाढत्या वयाच्या मुलांच्या वेगळ्या प्रकारच्या समस्या यामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे. काही धनदांडग्यांकरिता या प्रकारच्या विषयांना प्राधान्य देण्याऐवजी आदित्य ठाकरे अनधिकृत बांधकामांविरोधात मुख्यमंत्र्यांना का भेटत नाहीत’, असा प्रश्न त्यांनी केला.