News Flash

आरोग्य भवनात रात्र रंगली पार्टीची

सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि काही ठेकेदारांनी शनिवारी रात्री सेंट जॉर्ज रुग्णालय संकुलातील आरोग्य भवनात धूडगुस घातला. यावेळी झालेल्या हाणामारीत काही कर्मचाऱ्यांची डोकी फुटल्याचे

| April 3, 2013 01:35 am

सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि काही ठेकेदारांनी शनिवारी रात्री सेंट जॉर्ज रुग्णालय संकुलातील आरोग्य भवनात धूडगुस घातला. यावेळी झालेल्या हाणामारीत काही कर्मचाऱ्यांची डोकी फुटल्याचे उघडकीस आले आहे.
आर्थिक वर्षांच्या अखेरीस म्हणजे ३०-३१ मार्च रोजी बिले मंजूर करून घेण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयात धावपळ उडाली होती. याला सार्वजनिक आरोग्य विभागही अपवाद ठरला नाही. शनिवारी दिवसभर ठेकेदार, कर्मचारी, अधिकारी अशा सर्वाचीच निधीच्या विनियोगासाठी धावपळ सुरू होती. खर्च न झालेला निधी सरकारकडे परत जाऊ नये, त्याचा विनियोग व्हावा यासाठी आरोग्य विभागातील यंत्रणा कामाला लागली होती. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकारीही ठाण मांडून बसले होते. मात्र या अधिकाऱ्यांनी कार्यालय सोडल्यानंतर रात्री उशीरा आरोग्य विभागातील काही कर्मचारी, अधिकारी आणि ठेकेदार यांनी जंगी पार्टी केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. विशेष म्हणजे त्यात सुरक्षा रक्षकही सहभागी झाले होते. उत्तररात्री ही पार्टी इतकी रंगली की, सगळ्यांची माथी गरम झाली. त्याची परिणती सुरक्षा रक्षकांमध्ये आपापसात हाणामारीत झाली. त्यात एका सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला शेजारच्याच सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी हा जखमी सुरक्षा रक्षक रमाबाई आंबेडकर नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेला असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण मिटविण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यामुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ शकला नसला तरी या पार्टीची आरोग्य विभागात जोरदार कुजबूज सुरू होती.
यासंदर्भात विभागाच्या संचालिका अर्चना पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, घडलेल्या घटनेची चौकशी करण्यासाठी सहसंचालक (प्रशासन) यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त होताच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 1:35 am

Web Title: night party in health department office by its workers
Next Stories
1 राहुल शेवाळे, यशोधर फणसे यांच्या नियुक्तीमुळे शिवसेना नगरसेवकांमध्ये धुसफूस
2 पं. रविशंकर यांना ‘राग श्रद्धा सुमनांजली’!
3 झोपडपट्टीतील शाळांना मिळणार चकाचक स्वच्छतागृह आणि पिण्याचे स्वच्छ पाणी
Just Now!
X