गेल्या तीन दिवसांपासून रात्री अकरानंतर विशिष्ट प्रकारचा वायू काही कंपन्यांमधून सोडण्यात येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अपरात्री उग्र दर्प असणारा वायू हवेत सोडून झोपेचे खोबरे करणाऱ्या कंपन्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, अशी मागणी डोंबिवलीतील नागरिकांनी केली आहे.
डोंबिवली क्रीडासंकुल, आजदे, जिमखाना, गोग्रासवाडी, पाथर्ली, एमआयडीसी भागातील नागरिकांना या वायुप्रदूषणाचा सर्वाधिक त्रास होतो. अमोनियासदृश या वायूचा वास असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या प्रदूषणामुळे घशाला खवखव, डोळे चुरचुरणे, अस्वस्थ वाटणे असे प्रकार होत आहेत. वृद्ध, ज्येष्ठ नागरिकांना या प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास होतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रात्रीच्या वेळेत या भागात फिरती गस्त घालून या दरुगधींच्या उगमस्थानाचा शोध घ्यावा आणि दोषींविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी गोग्रासवाडी भागातील नागरिकांनी केली आहे.
मोठय़ा कंपन्या प्रदूषण करतात. त्याचे चटके नाहक लहान उद्योगांना बसतात. प्रदूषणाच्या नावाखाली एमआयडीसीतील चाळीस कंपन्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाच महिन्यांपूर्वी बंद केल्या होत्या. प्रदूषण कोण करतेय, याची खात्री न करताच सरसकट लहान उद्योगांवर कारवाई केली जाते. या जाचाला कंटाळून अनेक लघुउद्योजकांनी आपल्या कंपन्या बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. काही जणांनी कंपनी बंद करून अन्य व्यवसायाकडे मोहरा वळवला असल्याचे काही उद्योजकांनी सांगितले.